धावण्याच्या वेगाचे गणित…
धावणे हा व्यायामाचा एक उत्तम प्रकार आहे आणि त्यामुळे प्रकृती चांगली राहते असे सांगितले जात असले तरी आज प्रत्येकालाच वेगाने धावणे शक्य होत नाही याची करणे खूप आहेत. कमी वेगाने धावण्यातही व्यायाम होतोच फक्त या दोन्हींचे खास फायदे मात्र वेगवेगळे असतात. सामान्य फायदे हृदयाचे चांगले कार्य, आपला चांगला मूड आणि काही आजारांची कमी होणारी जोखीम असे असतात.
मग धावण्याचाच व्यायाम करायचा असेल आणि चांगले फायदे मिळवायचे असतील तर वेगाने धावावे की हळू? एका बाजूला वेगाने धावण्यात आपल्या कार्यक्षमतेची चुणूक दाखवता येते आणि त्यातच अधिक ऊर्जा खर्च करून कमी वेळात अधिक किलोमीटर्स पार करण्याचा आनंद मिळवू शकता. याउलट कमी वेगाने धावण्यातून आपण हृदयाच्या एका व्यवस्थेशी जोडले जातो आणि त्यातून हृदयासंबंधीचे भापूर फायदे आणि इजा होण्याची कमी जोखीम असू शकते.
पण वेगाने धावणे आणि हळू धावणे या व्यक्तीशी अनुरूप अशा बाबी असतात. नुकतीच धावायला सुरुवात केलेल्या व्यक्तीसाठी प्रत्येक किलोमीटरसाठी ६ मिनिटे लागणे हे धावपटू असलेल्या व्यक्तीच्या तुलनेत खूपच हळू असेल आणि ४ ते ५ मिनिटे लागणे हे बरेच जलद असू शकते. यामुळे धावताना धाप न लागणे हा एक आणि धावताना बोलता येणे शक्य असावे असा दुसरा निकष या विषयातील तज्ञ लावतात. धावण्याच्या व्यायामाला नुकतीच सुरुवात करीत असाल तर अधूनमधून चालणे सुरु ठेवल्यामुळे तुम्हाला या व्यायामाची सवय होईल असे अमेरिकेतील एका शक्तिमान धावपटू संस्थेच्या संस्थापक जॅनेट हॅमिल्टन म्हणतात. तुही आपल्या धावण्याच्या वेळी हृदयाचे ठोके मोजण्याची यंत्रे वापरीत असाल तर तुम्हाला हळू धावण्याने फायदा होऊ शकेल. यावेळी तुमचे हृदय कमाल क्षमतेच्या ५० टक्के वग दाखवील असे आणखी एक तज्ञ मॅट कँपबेल यांनी म्हटले आहे. वेगाने धावण्याचा विचार करणारांसाठी संभाषण हा पर्यायच असू शकत नाही कारण यावेळी त्यांचे हृदय अक्षरश: ७५ ते ९० टक्के वेगाने काम करीत असेल. त्यामुळे या प्रकारच्या धावण्याचा व्यायाम करू बघणारांसाठी जोखीम बरीच अधिक असू शकते.
शारीरिक फिटनेसच्या जगात वावरताना कमी वेगाने धावण्याचा व्यायाम करणारांना योग्य न्याय मिळत नाही. जमेल त्या वेगाने धावण्याचा व्यायाम करण्यात चुकीचे काहीच नसून उलट ते आरोग्याच्या दृष्टीने अधिक फायदेशीर ठरते हे लोकांना कळतच नाही की काय अशी शंका येते. हळू धावण्यामुळे आपले शरीर आपल्या पेशींमधील ऊर्जा निर्मिती करून आपल्या हालचालींना इंधन पुरवठा करणाऱ्या ‘मायटोकॉन्द्रिया (mitochondria) या अतिसूक्ष्म घटकांचा आकार वाढवीत असतात. आरोग्याच्या दृष्टीने स्नायू, रक्ताचा साठा वाढवणे इत्यादीच्या दृष्टीने हे महत्वाचे आहे. धावायचे तर नक्कीच पण वेगाने की हळू हे आपण स्वत:च ठरवायचे आहे. तुम्हाला केवळ आरोग्याच्या दृष्टीने आणि आजारांची जोखीम कमी करण्यासाठी धावायचे असेल तर हळू धावण्याचा पर्याय निवडावा असे जॅनेट हॅमिल्टन म्हणतात. वेगाने धावण्याचा व्यायाम रोज करून आपल्यापैकी प्रत्येकाला धावपटू व्हायचे नाहीय. निरोगी राहणे हेच ध्येय असेल तर हळू धावलाट तरी चालेल पण सातत्याने…खंड पडू देऊ नका…
काहीतरी नवीन…
श्याम तारे
प्रसन्न फीचर्स
