हरिभाऊ लाखे
नाशिक : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण पोलिसांनी स्थानिक पातळीवर दाबण्याचा प्रयत्न केला. स्थानिक नेत्यांनी आणि पोलिसांनी पीडितांना न्याय मिळेल अशी कृती करणे अपेक्षित असताना प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न झाला, असा आरोप महिला कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केला आहे. या प्रश्नाचे कोणीही राजकारण करू नये, असे आवाहनही त्यांनी केले.
मंगळवारी देसाई नाशिक येथे आल्या असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना देसाई यांनी सांगितले की सहा मार्च रोजी नाशिक व नगर येथून काहींनी पेनड्राईव्ह दिल्यावर हे प्रकरण किती गंभीर आहे हे समजले. पण त्याच वेळी खरात हा परदेशात जाणार असल्याचे समजले. तो फरार झाला असता, त्यामुळे या सर्व प्रकारची माहिती नाशिक आणि नगर पोलिसांच्या मदतीने मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवली.
मुख्यमंत्र्यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतल्यामुळे खरात याला अटक झाली. शासकीय यंत्रणेच्या मदतीने आरोपीला अटक करण्यात आली. वास्तविक, याविषयी स्थानिक लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यायला हवा होता. पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारीच खरात याला गुरू मानत होते, त्यांनी तक्रार दाबण्याचा प्रयत्न केला. पोलीस महानिरीक्षकांसारख्या पदाचा असा गैरवापर होणे चुकीचे असल्याचे त्या म्हणाल्या.
आम्हाला केवळ पीडित महिलेला न्याय मिळायला हवा आहे. राजकीय महिला लोकप्रतिनिधींकडून आरोप-प्रत्यारोप करत हा विषय भरकटवण्याचा प्रयत्न होत आहे. केवळ पीडित महिलेला न्याय मिळावा हीच इच्छा आहे. या पार्श्वभूमीवर, खरात याचा खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात यावा, त्याला फाशीची शिक्षा व्हावी, तसेच त्याचे सिन्नर (मीरगाव) येथील ईशानेश्वर मंदिर शासनाने स्थानिक गावकऱ्यांच्या ताब्यात द्यावे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथकाने (एसआयटी) मंदिराच्या कार्यकारणीवरील अन्य विश्वस्तांची चौकशी करून त्यांचे जबाब नोंदवावेत आणि या टोळीवर ‘मोक्का’अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, मंगळवारी खरात याला न्यायालयात आणण्यात येणार होते. त्यावेळी माध्यमांशी बोलताना देसाई म्हणाल्या की, खरातची कृत्ये पाहता त्याच्या कानशिलात लगावायची आहे, यासाठीच मी न्यायालयाच्या आवारात आले आहे. पोलिसांनी गदारोळ होऊ नये यासाठी या ठिकाणी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. देसाई खरात याला मारण्यासाठी पुढे गेल्या असता पोलिसांच्या ‘दामिनी पथकाने’ त्यांना अडवले. यावेळी देसाई यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
