महाराष्ट्रात घुमणार इनडोअर क्रिकेटचा आवाज!
गरवारे क्लब, वानखेडे स्टेडियममध्ये क्रीडा संघटकांचा ऐतिहासिक मेळावा
मुंबई: पारंपारिक क्रिकेटच्या चौकटीबाहेर आता नव्या थराराची चाहूल लागली आहे! महाराष्ट्रात इनडोअर क्रिकेटचा झंझावात घुमवण्यासाठी ‘महाइनडोर क्रिकेट असोसिएशन’ सज्ज झाली असून, गरवारे क्लब हाऊस, वानखेडे स्टेडियममध्ये झालेल्या ऐतिहासिक मेळाव्याने राज्यातील क्रीडाक्षेत्रात नव्या युगाची दमदार सुरुवात केली आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या क्रीडा संघटकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे या उपक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असून, इनडोअर क्रिकेटच्या विस्तारासाठी भक्कम पायाभरणी झाली आहे.
नियमावलीचा ‘मास्टरक्लास’ खेळाचा वेग आणि थरार उलगडला
या भव्य बैठकीत आंतरराष्ट्रीय पंच शहाबाज माजगांवकर यांनी इनडोअर क्रिकेटच्या तांत्रिक नियमावलीचे सखोल मार्गदर्शन करत उपस्थितांना खेळाचे बारकावे समजावून सांगितले. मैदानी क्रिकेटपेक्षा अधिक वेगवान, चुरशीचा आणि रणनीतीपूर्ण असा हा खेळ कसा असतो, याचे जिवंत चित्र त्यांनी उभे केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे उपस्थित संघटकांना इनडोअर क्रिकेटचे तांत्रिक ज्ञान मिळाले आणि आगामी स्पर्धांचे नियोजन अधिक प्रभावीपणे करण्याचा आत्मविश्वास वाढला.
असोसिएशनचे संस्थापक चेअरमन क्षितिज वेदक आणि संस्थापक सचिव बाळासाहेब (बाळ) तोरसकर यांनी जिल्हा व तालुका स्तरावर संघटन विस्तारासाठी ठोस दिशा दिली. “महाराष्ट्रातील प्रत्येक खेळाडूला आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्यासपीठ मिळवून देणे, हेच आमचे ध्येय आहे,” असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला. खेळाचा प्रचार-प्रसार घराघरात पोहोचवण्याचे नियोजन, तसेच संघटनात्मक मजबुतीसाठी आवश्यक पावले यावर त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
या मेळाव्यात जळगाव, छत्रपती संभाजी नगर आणि अमरावती येथील क्रीडा संघटनांनी पुढाकार घेत मे २०२६ पूर्वी विविध गटांच्या राज्य अजिंक्यपद इनडोअर स्पर्धा आयोजित करण्याची तयारी दर्शवली. संपूर्ण महाराष्ट्रातील क्रीडा संघटकांनी या उपक्रमाला जोरदार पाठिंबा देत स्पर्धा यशस्वी करण्याची ग्वाही दिली. त्यामुळे जिल्हा आणि तालुका स्तरावर इनडोअर क्रिकेटचे जाळे विणण्यास गती मिळणार असून नवोदित खेळाडूंना मोठे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.
या ऐतिहासिक कार्यक्रमामुळे महाराष्ट्रातील क्रिकेटप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, लवकरच प्रत्येक जिल्ह्यात इनडोअर क्रिकेटचे सामने रंगताना दिसणार आहेत. पारंपारिक क्रिकेटसोबतच आता इनडोअर क्रिकेटही राज्यात लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचण्याची चिन्हे स्पष्ट दिसत असून, महाराष्ट्राच्या क्रीडा नकाशावर हा नवा अध्याय सुवर्णाक्षरांनी लिहिला जाणार आहे.
