साईंच्या पालखीतून अवतरले ‘देवदूत’

धामणगाव अपघातातील जखमींना दिले जीवदान!

मुंबई : ईश्वराच्या भेटीसाठी निघालेली पावले जेव्हा संकटात सापडलेल्या माणसांच्या मदतीसाठी धावतात, तेव्हा खऱ्या अर्थाने देव पावल्याची प्रचिती येते. असाच अंगावर काटा आणणारा आणि प्रत्येकाची छाती अभिमानाने फुलवून टाकणारा प्रसंग रविवारी रात्री धामणगाव – कवडदरा येथे घडला. भीषण रस्ते अपघातात रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तीन मरणोन्मुख तरुणांसाठी ‘भटवाडी साईदर्शन सेवा संस्थे’चे पदयात्री अक्षरशः देवदूत बनून धावून आले आणि त्यांनी प्राण वाचवले.

नेमके काय घडले होते ?

रविवारी धामणगाव – कवडदरा मार्गावर दोन मोटरसायकलींची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. धडक इतकी जोराची होती की तीन जण गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावर पडले होते. अंधाराची वेळ आणि मदतीची वानवा अशा अगतिक परिस्थितीत अपघातग्रस्तांचे प्राण कंठाशी आले होते.जेव्हा टाळ-मृदुंगाचा गजर थांबला आणि माणुसकी धावली… नेमक्या त्याच वेळी भटवाडी साईदर्शन सेवा संस्थेची पदयात्रींची दिंडी तिथून मार्गक्रमण करत होती. साईंच्या दर्शनाची ओढ लागलेल्या या भक्तांनी रस्त्यावरील हे विदारक दृश्य पाहताच क्षणाचाही विलंब केला नाही. त्यांनी भक्तीसोबतच कर्तव्याचे भान राखत तातडीने मदत कार्य सुरू केले. डॉ. जयेश सरमळकर यांनी जखमींवर तातडीने उपचार करण्यासाठी त्वरित हालचाली केल्या.

मंडळासोबत असलेल्या रुग्णवाहिकेतून या जखमींना अत्यंत सुरक्षितपणे मोहन वामन व जितेंद्र हरमळकर यांनी नजीकच्या रुग्णालयात पोहोचविले.विभागप्रमुख दिपकबाबा हांडे, गुरुनाथ सामंत, सिद्धू मांजरेकर, प्रतिक जाधव, सागर गायकवाड, करन पायमोडे यांनी रुग्णालय गाठून त्यांना उपचारासाठी दाखल केले आणि गोल्डन आवर्स मध्ये अपघातग्रस्थांना सहकार्य केल्यामुळे एसएमबीटी  रुग्णालयाकडून देखील साईभक्तांचे विशेष कौतुक केले. रुग्णालयाच्या प्रतिनिधींनी सांगितले की, “भटवाडी साई दर्शन सेवा संस्थेची रुग्णवाहिका अगदी वेळेत पोहोचली, ज्यामुळे जखमींना गोल्डन अवरमध्ये योग्य उपचार मिळू शकले. या भक्तांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे मोठे प्राणहानी टळली आहे.”

खऱ्या भक्तीचे दर्शन…

पायाला फोड आले तरी साई दर्शनाच्या ओढीने शेकडो किलोमीटर चालणाऱ्या या भक्तांनी केवळ मंदिरात देव न शोधता, संकटात सापडलेल्या माणसांत देव पाहिला. अंगात थकवा असतानाही दुसऱ्याचा जीव वाचवण्यासाठी दाखवलेली ही धडपड पाहून आज प्रत्येकाच्या डोळ्यात समाधानाचे अश्रू आहेत. या घटनेने भटवाडी साईदर्शन सेवा संस्थेच्या पदयात्रींनी साईंची ‘माणुसकीची’ शिकवण खऱ्या अर्थाने जगून दाखवली आहे. आज मुंबई वरून शिर्डीला येणाऱ्या सर्व पालख्यांना या थोर कार्याचा सार्थ अभिमान वाटत आहे असे निवृत्त पोलीस उपनिरीक्षक सुरेश जाधव यांनी म्हटले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *