जागतिक क्षयरोग दिनानिमित्त १०० दिवसांची विशेष मोहीम- निक्षय मित्रांचा होणार सत्कार
कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाच्या वतीने ‘टीबी मुक्त भारत अभियान २.०’ अंतर्गत १०० दिवसांच्या विशेष मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. या अभियानाद्वारे शहरातील क्षयरोगाचे उच्चाटन करून “टीबी मुक्त कल्याण-डोंबिवली” हे उद्दिष्ट साध्य करण्याचा निर्धार करण्यात आला आहे.
जागतिक क्षयरोग दिना निमित्त रुक्मिणीबाई रुग्णालय येथे विशेष जनजागृती पर कार्यक्रम राबवण्यात आला. या वेळी रुग्णासाठी पोषण आहार वाटप तसेच MDR रुग्णाकरिता विशेष PFT आणि XRAY तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले. इनरव्हील क्लब ऑफ कल्याण, रोटरी क्लब ठाणे जिल्हा ३१४२ आणि आय एम ए कल्याण यांच्यावतीने एकूण २१० क्षय रुग्णांना पोषण आहार किट यांचे वाटप करण्यात आले. यावेळी रुग्णांनी आपल्या आहाराची काळजी घ्यावी आणि उपचार पूर्ण करावा शिवाय भारत सरकारतर्फे राबविण्यात येणाऱ्या या पुढील शंभर दिवसाच्या कार्यक्रमात सर्वांनी सहभाग घेऊन कार्यक्रम यशस्वी करावा असे आवाहन आयएमए प्रेसिडेंट डॉ सुरेखा इटकर यांनी केले.
या कार्यक्रमावेळी बाई रुक्मिणी बाई रुग्णालय यांच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ सुलक्षणा त्रिभुवन,डॉ गणेश डोईफोडे , शहर क्षयरोग अधिकारी डॉ पौर्णिमा ढाके, चेस्ट फिजिशियन डॉ श्रेयस गोडबोले, डॉ रुतिका भोसले, डॉ धाकतोडे इनरव्हील क्लब ऑफ कल्याणच्या दीप्ती दिवाडकर, डॉ चिटणीस, एड नीता कदम आणि राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाचा संपूर्ण कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
जागतिक आरोग्य संघटनेच्या आवाहनानुसार दरवर्षी २४ मार्च हा दिवस क्षयरोग दिन म्हणून पाळला जातो. १८८२ साली डॉ. रॉबर्ट कोच यांनी क्षयरोगाच्या जीवाणूचा शोध लावल्याच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर महापालिका क्षेत्रात विविध जनजागृती उपक्रम, आरोग्य शिबिरे, तसेच तपासणी व उपचार सुविधा राबविण्यात येणार आहेत. २४ मार्च पासून कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात पुढील १०० दिवस निरनिराळे कार्यक्रम राबवून क्षयारोगाविषयी जनजागृती करण्यात येणार आहे.
या मोहिमेत घराघरांत जाऊन संशयित रुग्णांचा शोध घेणे. मोफत कफ तपासणी व एक्स-रे सुविधा, निदान झालेल्या रुग्णांना तत्काळ उपचार सुरू करणे, उपचार पूर्णत्व दर वाढवण्यासाठी विशेष पाठपुरावा, उच्च जोखमीच्या भागांमध्ये विशेष आरोग्य शिबिरे राबविण्यात येणार आहेत.
क्षयरोग निर्मूलनासाठी “निक्षय मित्र” ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यात येत असून, सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्था, उद्योगसमूह तसेच नागरिकांनी टीबी रुग्णांना दत्तक घेऊन त्यांना पोषण आहार, मानसिक आधार व आवश्यक मदत करावी, असे आवाहन करण्यात येत आहे. उत्कृष्ट कार्य करणाऱ्या निक्षय मित्रांचा यावेळी सत्कार करण्यात येणार आहे. शासनाच्या “निक्षय पोषण योजना” अंतर्गत टीबी रुग्णांना उपचार कालावधीत दरमहा ₹१०००/- आर्थिक सहाय्य दिले जाते. यामुळे रुग्णांच्या पोषण स्थितीत सुधारणा होऊन उपचार परिणामकारक होण्यास मदत होते.
“क्षयरोग हा संसर्गजन्य पण पूर्णपणे बरा होणारा आजार आहे. नागरिकांनी लक्षणे दिसताच तपासणी करून घ्यावी व उपचार पूर्ण करावेत. तसेच ‘निक्षय मित्र’ बनून या सामाजिक उपक्रमात सहभाग नोंदवावा.” असे आवाहन या वेळी महापालिकेतर्फे करण्यात आले.
0000000
