बाबासाहेबांच्या विचारांच्या अपरान्त साहित्य कला प्रबोधिनी सारख्या संस्था समाजाचा उत्कर्ष करतील- ॲड. संघराज रुपवते

अनिल ठाणेकर

ठाणे, मराठी ग्रंथ संग्रहालय सभागृहात “अपरान्त साहित्य कला प्रबोधिनी”चा तिसरा वर्धापन दिन सोहळा,संस्थेचे विद्यमान संस्थापक अध्यक्ष आदरणीय ज्येष्ठ साहित्यिक ज.वि.पवार यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी शानदारपणे साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे सर्वोच्च न्यायालयाचे महाधिवक्ता ॲडव्होकेट संघराज रुपवते यांनी अपरांत साहित्य कला प्रबोधिनीच्या लौकिकाला साजेल असं,गालिब पासून वामनदादा कर्डक यांच्या शेरोशायरीची पाखरण करत ‘काव्यमय न्याय’देणारं भाष्य केलं. ते म्हणाले, ‘आजच्या नेत्यांनी विश्वासार्हता गमावली आहे. परंतु अपरान्त सारख्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपणाऱ्या साहित्यिक संस्था बाबासाहेबांचे विचार नक्कीच पुढे नेतील.’

अपरान्तचे सरचिटणीस पत्रकार संदेश पवार यांनी आपल्या प्रास्ताविकात चिपळूण,कणकवली आणि क्रांती भूमी महाड येथे भरवलेल्या तीन “सम्यक साहित्य संगीती” पुस्तक प्रकाशन,काव्य संमेलनं,अपरान्त विशेषांक वगैरे वाटचाली विषयी आढावा घेतला.केंद्रीय उपाध्यक्ष आणि  पदसिद्ध रत्नागिरी जिल्हाध्यक्ष संजय गमरे आपलं मनोगत व्यक्त करताना म्हणाले,”संस्था आणि व्हाट्सअप ग्रुप या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आजच्या वर्धापन दिनापेक्षा जिल्हास्तरीय कार्यक्रमाला भरपूर गर्दी असते. संघटनेची भरीव बांधणी अद्याप म्हणावी तशी झालेली नाही. ‘पुस्तक पूर्व प्रकाशन योजना’ अपरान्तच्या वतीने राबवली गेली पाहिजे.”कार्याध्यक्ष प्राध्यापक आनंद देवडेकर सर म्हणाले,”अपरान्त संस्था बुद्धिझम आणि बाबासाहेबांच्या विचारांच्या मार्गानेच गेली पाहिजे. इतर संस्थेसारखी त्याची जडणघडण न होता. ध्येय आणि उद्दिष्ट लक्षात ठेवून संस्थेची वाटचाल केली पाहिजे.”आपल्या अध्यक्षीय भाषणात ज्येष्ठ पॅंथर आणि साहित्यिक ज.वि.पवार यांनी केंद्रीय कार्यकारिणी आणि उपस्थितांना भावनिक आवाहन केले. “तुम्ही सगळेजण चांगलं काम करीत आहात. माझ्या सहवासातल्या प्रत्येक लेखकाचं पुस्तक लवकरात लवकर आलं पाहिजे. मी अजूनही काम करीत आहे. करीत राहणार! परंतु इतक्या प्रदीर्घ वाटचालीने थकलो आहे. तरी तुम्ही माझ्या खांद्यावर उभे रहा.आणि अपरान्तच्या माध्यमातून आंबेडकरी विचारांचे दूरदृष्टीने व्हिजन पहा.मी तुम्हाला सर्वतोपरी मदत करीन.”अपरान्त साहित्य कला प्रबोधिनीच्या तिसऱ्या वर्धापन दिन कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे ॲडव्होकेट संघराज रूपवते, विद्यमान संस्थापक अध्यक्ष ज.वी.पवार ,कार्याध्यक्ष प्रा.आनंद देवडेकर,ज्येष्ठ केंद्रीय कार्यकारिणी सदस्य डॉ. श्रीधर पवार यांच्या अमेरिका स्थित आंबेडकरी चळवळ चालवणाऱ्या मुलीचे सृजनाचे दोन इंटरव्यू असलेले छोट्या पुस्तिकेचे प्रकाशन झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *