भारत आनंदी का नाही?
२० मार्च हा दिवस जागतिक आनंद दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून संयुक्त राष्ट्र संघाच्या सस्टनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्कद्वारे दरवर्षी एक सर्व्हे केला जातो. संपत्ती, आरोग्या बरोबरच परस्परंवरील विश्वास, ऋणानुबंध, करुणा या निकषांच्या आधारावर हे सर्व्हेक्षण केले जाते. वरील निकषांचा विचार करून यावर्षीही या संस्थेने जगातील १४७ देशांचा सर्व्हे करून एक अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालात या संस्थेने जगातील सर्वाधिक आनंदी देशांची यादी प्रसिद्ध केली. या यादीतील पहिल्या वीस देशांमध्ये युरोपातील देशांचे वर्चस्व आहे. गेल्या अनेक वर्षापासून युद्धाच्या आगीत होरपळणारा इस्राईल हा देश आनंदी देशांच्या यादीत आठव्या स्थानी आहे. सतत युद्धाच्या छायेत राहूनही इस्रायली नागरिक आनंदी आहेत. या अहवालानुसार जगातील सर्वात आनंदी देश म्हणून फिनलँड या देशाची निवड करण्यात आली. विशेष म्हणजे फिनलँड हा देश सलग नऊव्यांदा जगातील सर्वात आनंदी देश ठरला आहे. भारत मात्र या देशांच्या यादीत खूप खालच्या क्रमांकावर आहे. १४७ देशांच्या यादीत भारत ११६ व्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे पाकिस्तान, नेपाळ, आणि चीन हे भारताच्या शेजारी देश भारतापेक्षा अधिक आनंदी आहेत असा हा अहवाल सांगतो. पाकिस्तान, नेपाळ आणि चीन यासारख्या देशात सध्या मोठया प्रमाणात अराजकता माजली असताना देखील ते देश आनंदी आहेत इतकेच काय तर युद्धग्रस्त युक्रेन आणि पॅलेस्टाईन हे देशही भारतापेक्षा अधिक आनंदी आहेत. आनंदी देशांच्या यादीत युक्रेन १११ व्या क्रमांकावर आहे तर पॅलेस्टाईन १०८ व्या क्रमांकावर आहे. जगातील गरीब, मागास आणि युद्धाच्या छायेत असणाऱ्या देशातील लोक आनंदी असताना भारतासारख्या खंडप्राय देशातील लोक आनंदाबाबतीत तळाच्या स्थानी असणे ही चिंतेचीच बाब आहे. भारतातील नागरिक आनंदी का राहू शकत नाहीत, याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. फिनलँडने सलग नऊव्यांदा आनंदी देशाच्या यादीत अव्वल क्रमांक मिळवला याला कारणही तसेच आहे. येथे अनेक गोष्टी निर्विवादपणे चांगल्या आहेत. सुंदर निसर्ग, विस्तीर्ण जंगले आणि तलावांचा देश. हा देश सर्वव्यापी सार्वजनिक सेवांसाठी देखील ओळखला जातो. आम्ही सुस्थितीत आहोत, देशाच्या बऱ्याच गोष्टी व्यवस्थित आहेत असा तेथील लोकांना विश्वास आहे. अधिकारावरील व्यापक विश्वास, गुन्हेगारीचा निम्नस्तर आणि समानता असे मत तेथील लोकांनी व्यक्त केले. आनंदाच्या अहवालातील एक महत्वाचे मोजमाप म्हणजे लोकांना किती सुरक्षित वाटते. फिनलँडने काही वर्षांपूर्वी आपल्या शिक्षण प्रणालीत आमूलाग्र बदल केला आहे. फिनलँड मधील शिक्षण प्रणाली ही जगातील सर्वोत्तम शिक्षण प्रणाली मानली जाते. फिनलँड देशात बेरोजगारीचा दर सर्वात कमी आहे. शिवाय तेथील आरोग्य प्रणाली देखील सर्वोत्तम आहे. त्यामुळे तेथील लोक सर्वाधिक आनंदी आहेत. फिनलँड देशाला इतर देशांपेक्षा वेगळे बनवणारा आणखी एक घटक म्हणजे समानता. जी प्रत्येकासाठी संधी निर्माण करते. मग ते कोणत्याही सामाजिक, आर्थिक पार्श्वभूमीचे असले तरीही. फिनलँडमध्ये मध्यमवर्ग जास्त आहे आणि गरिबी कमी आहे. भारतातही फिनलँड सारखी व्यवस्था निर्माण झाली तर भारतीय लोकही आनंदी राहतील. मात्र येथील व्यवस्था बदलण्याची इच्छाशक्ती कोणाकडे नाही म्हणूनच भारत आनंदी देशाच्या यादीत तळाच्या स्थानी आहे.
श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५
