सुधारणा विधेयक `ट्रान्सजेंडर व्यक्तींच्या’च्या खडतर आयुष्याच्या वाटेवर नवीन आशेचा किरण – नरेश म्हस्के

अनिल ठाणेकर

नवी दिल्ली : केंद्र सरकारने आणलेल्या `ट्रान्सजेंडर व्यक्ती : हक्क-संरक्षण-सुधारणा विधेयक, २०२६’ या महत्त्वपूर्ण आणि संवेदनशील विषयावर संसदेत चर्चा करतांना आज शिवसेना पक्षाच्या वतीने खासदार नरेश म्हस्के यांनी या  ऐतिहासिक विधेयकाचे स्वागत करत शिवसेना पक्षाचा पाठिंबा जाहीर केला. समाजाच्या मुख्य प्रवाहापासून वर्षानुवर्षे दूर ठेवलेल्या ट्रान्सजेंडर बांधवांना सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळवून देणं ही काळाची गरज आहे. विकास हा तेव्हाच खरा ठरतो जेव्हा समाजातील शेवटच्या घटकापर्यंत त्याचा लाभ पोहोचतो, असे मत खासदार नरेश म्हस्के यांनी विधेयकाचे समर्थन करताना ठामपणे मांडले.

यावेळी उपमुख्यमंत्री  एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारने राबवलेल्या ‘महाराष्ट्र ट्रान्सजेंडर धोरण 2024’चा खासदार नरेश म्हस्के यांनी विशेष उल्लेख करत, राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयांमुळे या समाजाला विविध शासकीय योजनांचा थेट लाभ मिळत असल्याचं सांगितलं. ओळखपत्र, रेशन कार्ड, निवास प्रमाणपत्र यांसारख्या मूलभूत गोष्टी मिळवताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांमुळे त्यांच्या आयुष्यात मोठा सकारात्मक बदल घडत असल्याचं खासदार नरेश म्हस्के यांनी सांगितले. या विधेयकातील तरतुदींमुळे ट्रान्सजेंडर व्यक्तींना त्यांच्या घरातून किंवा समाजातून हाकलून देणं, सार्वजनिक ठिकाणी जाण्यास अडथळा निर्माण करणं किंवा कोणत्याही प्रकारचा भेदभाव करणं हा गुन्हा ठरणार आहे. तसेच शारीरिक, मानसिक, आर्थिक आणि लैंगिक शोषणाविरुद्ध कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आल्यामुळे या समाजाला सुरक्षिततेची नवी हमी मिळणार  असल्याचे खासदार नरेश म्हस्के म्हणाले. केंद्र सरकारच्या विविध उपक्रमांचा उल्लेख करत, ‘SMILE’ योजनेअंतर्गत गरिमा गृह, राष्ट्रीय ट्रान्सजेंडर परिषद, तसेच आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात घेतलेल्या सकारात्मक निर्णयांमुळे या समाजाचा आत्मविश्वास वाढत असल्याचंही खासदार नरेश म्हस्के यांनी नमूद केलं. ट्रान्सजेंडर व्यक्ती हे आपल्या समाजाचाच अविभाज्य भाग असून त्यांना तिरस्कार नव्हे तर सन्मान मिळाला पाहिजे, असं मतही खासदार नरेश म्हस्के यांनी ठामपणे मांडलं.राजकारणाच्या पलीकडे जाऊन सर्व पक्षांनी एकत्र येत या विधेयकाला सर्वानुमते मंजुरी द्यावी, असं आवाहन खासदार नरेश म्हस्के यांनी करत, प्रत्येक व्यक्तीच्या ओळखीचा सन्मान करणारा, समावेशक आणि संवेदनशील भारत घडवण्याचा निर्धार व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *