३० कलाकारांची अभूतपूर्व ऐतिहासिक शास्त्रीय स्वरमैफल ‘अर्घ्य २०२६’
पद्मश्री तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत रंगली
मुंबई: बांद्रा येथील बालगंधर्व रंगमंदिरात ‘अर्घ्य इंडियन क्लासिकल म्युझिक अँड फाईन आर्ट फाउंडेशन’तर्फे आयोजित ‘अर्घ्य २०२६’ ही भव्य आणि ऐतिहासिक शास्त्रीय संगीत स्वरमैफल अत्यंत उत्साहात आणि रसिकांच्या दादेत पार पडली. संध्याकाळी ६.३० वाजता सुरू झालेल्या या कार्यक्रमात तब्बल ३० कलाकारांनी एकत्रित सादरीकरण करत एक अद्वितीय सांगीतिक अनुभव प्रेक्षकांना दिला.
या विशेष स्वर मैफिलीत सतारवादक पं. रवी चारी, प्रख्यात गायक पं. राम देशपांडे, बासरीवादक पं. रूपक कुलकर्णी, तबलावादक पं. योगेश साम्सी आणि पखवाजवादक श्री कृष्णा साळुंके या पाच दिग्गज कलाकारांनी आपल्या शिष्यांसह एकाच मंचावर सादरीकरण करत गुरु-शिष्य परंपरेचा भव्य आविष्कार साकारला. विविध घराण्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या कलाकारांनी राग आणि ताल यांच्या शाश्वत संगमातून एक सुरेल, समन्वयपूर्ण आणि मंत्रमुग्ध करणारी ‘सिम्फनी’ साकारली.
या कार्यक्रमाला पद्मश्री तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांची मुख्य अतिथी म्हणून लाभलेली उपस्थिती ही मैफलीची विशेष आकर्षण ठरली. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला एक वेगळीच उंची आणि आध्यात्मिक अधोरेखित अर्थ प्राप्त झाला. आजच्या काळात फ्युजन संगीताचा प्रभाव वाढत असताना ‘अर्घ्य २०२६’ने शुद्ध भारतीय शास्त्रीय संगीताचा एक भव्य आणि सखोल पर्याय रसिकांसमोर यशस्वीपणे मांडला. अनेक वाद्ये आणि स्वर एकत्र आणत तयार झालेल्या या संगीतमय संवादाने श्रोत्यांना भावनिक आणि ध्यानमग्न अनुभव दिला.
ही केवळ एक मैफल नसून भारतीय संगीत परंपरेचा एक जिवंत उत्सव ठरला. ‘अर्घ्य २०२६’ने परंपरा, विद्वत्ता आणि भक्तिभाव यांचा संगम घडवत रसिकांच्या मनात अविस्मरणीय ठसा उमटवला.
