आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्जास ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

३ ते ५ किमी अंतरावरील शाळांचे पर्याय निवडण्याची संधी कायम

ठाणे: शिक्षणाचा हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) खासगी विनाअनुदानित शाळांमधील २५ टक्के राखीव प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत आता३१ मार्चपर्यंत वाढविण्यात आली आहे. पालकांना अर्ज सादर करण्यासाठी तसेच आवश्यक दुरुस्ती करण्यासाठी अतिरिक्त वेळ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही मुदतवाढ देण्यात आली आहे.

यापूर्वी जाहीर केल्यानुसार, पालकांना ३ ते ५ किलोमीटर अंतरावरील शाळांचे पर्याय निवडण्याची सुविधा कायम ठेवण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या निर्देशानुसार शाळेच्या अंतरासंबंधीची १ किलोमीटरची अट शिथिल करण्यात आल्यामुळे पालकांना अधिक शाळांचे पर्याय उपलब्ध झाले आहेत. या निर्णयामुळे अधिकाधिक पात्र विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीच्या शाळांमध्ये प्रवेश मिळण्यास मदत होणार आहे.

तसेच, ज्या पालकांनी यापूर्वी ऑनलाईन अर्ज सादर केले आहेत, त्यांना अर्जामध्ये आवश्यक दुरुस्ती करण्यासाठी ‘अनकन्फर्म’ करून पुन्हा ‘कन्फर्म’ करण्याची सुविधा पोर्टलवर उपलब्ध आहे. याबाबत पालकांना पोर्टलवरील पॉप-अप सूचनांद्वारे माहिती देण्यात येत आहे.

शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद ठाणे श्री. बाळासाहेब राक्षे यांनी सांगितले की, “आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेत जास्तीत जास्त पात्र विद्यार्थ्यांचा समावेश व्हावा, यासाठी अर्ज भरण्याची मुदत ३१ मार्चपर्यंत वाढविण्यात आली आहे. पालकांनी या संधीचा लाभ घेऊन अर्ज सादर करावेत तसेच आवश्यक असल्यास दुरुस्ती करून प्रक्रिया पूर्ण करावी.” तरी सर्व पात्र पालकांनी मुदतवाढीचा लाभ घेऊन नवीन अर्ज सादर करावेत किंवा पूर्वीच्या अर्जांमध्ये आवश्यक दुरुस्ती करून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी, तसेच ही माहिती अधिकाधिक पालकांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन शिक्षण विभागामार्फत करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *