आझाद मैदानातील आंदोलनाची तातडीने दखल
रमेश औताडे
मुंबई: स्थानिक पातळीवर सामान्य जनतेला न्याय मिळत नसल्याने मुंबईत आझाद मैदानात आंदोलन केले की मंत्रालयात वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू होतात. याच पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील महसुल प्रशासनाशी निगडीत विविध विषयांवर ६ एप्रिल पासून आझाद मैदान मुंबई येथे सामाजिक कार्यकर्ते अशोकराव टाव्हरे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन सुरू झाले आहे. पहिल्या दिवशीच तातडीने महसुल विभागाचे सहसचिव अजित देशमुख यांची भेट आझाद मैदान पोलीसांनी दिली आहे.
देशमुख यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी यांना फोन करून तातडीने प्रलंबित अहवाल पाठविण्यास सांगितले आहे तसेच महसुल विभाग ज-५ कार्यासनाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना पत्रही दिले आहे. आझाद मैदान येथे अशोकराव टाव्हरे यांच्यासह सुदाम बोरकर, मंगेश नढे, संतोष लोहोकरे, विशाल खाताळे, रामराव लिंबोळे, राहुल अभंग, योगेश भामरे आंदोलनात सहभागी झाले आहेत.
चांडोली, तालुका खेड. जिल्हा पुणे येथील गट नं १२६ प्रकरणी तत्कालीन तहसीलदार यांनी जानेवारी २०२० मध्ये भोगावटा २, मधून भोगावटा १ ची कार्यवाही अनाधिकाराने केली आहे. महसुल विभाग ज-५ यांनी एक वर्षापुर्वी तीन पत्रे देऊनही अहवाल जिल्हाधिकारी पुणे यांनी शासनास पाठविला नाही.
१५५ अन्वये एका प्रकरणी उपजिल्हाधिकारी कुळकायदा पुणे यांनी मे २०२५ मध्ये उपविभागीय अधिकारी, प्रांत खेड यांना पत्र दिले. जुलै २०२५ मध्ये त्यांनी तहसीलदार खेड यांना पत्र दिले परंतु आजतागायत तहसीलदार यांनी अहवाल पाठविला नाही.
उपविभागीय अधिकारी खेड यांनी एका प्रकरणी दोन आदेश पारित केले आहेत. अनेक प्रकरणी सुनावणी संपूनही वर्षभर निकाल दिले जात नाही. या सर्व प्रकरणी ठोस कार्यवाही होईपर्यंत व महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट होऊन न्याय मिळेपर्यंत आंदोलन करणार असल्याचे टाव्हरे यांनी सांगितले.
