गौड युनियनवर ६ विकेटने मात; मनीष राव ‘मॅन ऑफ द मॅच’
मुंबई : इस्प्लनेड लिबरल्स क्रिकेट क्लबच्या वतीने आयोजित समर व्हेकेशन क्रिकेट शिल्ड टूर्नामेंटमध्ये केआरपी XI क्रिकेट क्लबने दमदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात केआरपी XI ने गौड युनियन क्रिकेट क्लबचा ६ विकेटने पराभव करत चषकावर आपले नाव कोरले.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या गौड युनियन क्लबने १३९ धावांपर्यंत मजल मारली. संघाकडून योगेश पवार यांनी ६५ धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली. मात्र, केआरपी XI चे कर्णधार मनीष राव यांनी भेदक गोलंदाजी करत २५ धावांत ४ बळी घेत प्रतिस्पर्ध्यांना रोखले.
१३९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना केआरपी XI संघाने संयमित आणि आक्रमक खेळाचा सुरेख संगम साधत केवळ ४ विकेट गमावत लक्ष्य गाठले. समृद्ध भट्ट यांनी नाबाद ६२ धावांची खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला, तर मनीष राव यांनीही नाबाद २९ धावा करून विजयाची खात्री केली.
अंतिम सामन्यातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल मनीष राव यांना सर्वोत्तम क्रिकेटपटू तसेच उत्कृष्ट गोलंदाजाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. योगेश पवार यांनी स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाजाचा किताब पटकावला.
स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक, सचिव प्रा. डॉ. उन्मेश खानविलकर, एक्झिक्युटिव्ह सेक्रेटरी सी. एस. नाईक, माजी उपाध्यक्ष संजय नाईक तसेच आजी-माजी कार्यकारणी सदस्य व विविध क्लबचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. स्पर्धेचे अध्यक्ष श्रीकांत तिगडी, सचिव अरविंद कदम आणि सागर तिगडी यांनी सर्व विजेत्यांचे अभिनंदन करत स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले.
000000
