केडीएमसी स्थायी समिती सभापतीपदी शिवसेनेचे मल्लेश शेट्टी यांची बिनविरोध निवड
महिला बालकल्याण समितीसाठी सारिका जाधव, शिक्षण मंडळासाठी भाजपाचे अभिजित थरवळ यांची निवड
कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या तिजोरीच्या चाव्या या शिवसेनेकडेच राहणार असून स्थायी समिती सभापती पदी शिवसेनेचे नगरसेवक मल्लेश शेट्टी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तर महिला बाल कल्याण समिती सभापती पदासाठी शिवसेनेच्याच नगरसेविका सारिका जाधव आणि शिक्षण मंडळ सभापती पदासाठी भाजपचे नगरसेवक अभिजीत थरवळ यांची देखील बिनविरोध निवड करण्यात आली.
या उमेदवारांनी 2 एप्रिलला आपली नामनिर्देशन पत्रे महापालिका सचिव किशोर शेळके यांच्याकडे दाखल केली होती. केडीएमसी मुख्यालयातील स्थायी समिती सभागृहात आज या तिन्ही सभापती पदांसाठी निवडणूक अधिकारी रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली. या तिन्ही पदांसाठी एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने या तिघांचीही निवड बिनविरोध झाल्याचे जाहीर करण्यात आले. यावेळी महापालिका आयुक्त अभिनव गोयल, महापौर हर्षाली चौधरी, उपमहापौर राहुल दामले, आमदार राजेश मोरे, शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांच्यासह शिवसेना भाजपाचे अनेक नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते.
