बारामतीचे ‘बारामती’ राजकारण

सुनेत्रा पवारांनी ‘अर्ज’ भरला

शरद पवारांनी ‘शपथ’ घेतली

स्वाती घोसाळकर

बारामती : राज्याच्या राजकारणात बारामतीचे दोन फोटो दिवसभर चर्चेत होते. दिल्लीच्या राज्यसभेत शरद पवारांनी खासदारकीची आज शपथ घेतली तर पवारांच्या बाले किल्ल्यात अजित पवारांच्या निधनाने रिक्त झालेल्या विधानसभेच्या जागेवर सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. सुनेत्रा पवारांना पाठींबा दिला नसून आम्ही त्यांच्याविरोधात कुटुंबप्रमुख म्हणून उमेदवार न देण्याचा निर्णय घेतलाय अशी गुगली शरद पवारांनी टाकली. तर दुसरीकडे बारामती हा केवळ मतदारसंघ नसून दादांचा श्वास होता आणि त्या श्वासाशी नाळ जुळलेली प्रत्येक व्यक्ती माझ्यासाठी महत्त्वाची असून ही निवडणूक माझी वैयक्तिक नसून दादांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक बारामतीकरांची आहे, अशा भावनिक साद उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी मतदारांनी घातली आहे.

तुम्ही सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला आहे. पण, तुम्ही किंवा सुप्रिया सुळे सुनेत्रा पवारांचा प्रचार करणार आहात का? असा प्रश्नही शरद पवारांना विचारण्यात आला. ते म्हणाले, “नाही. आम्ही उमेदवारच उभा केला नाही. आमचा उमेदवारच नाही, प्रचार काय करायचा?”

राष्ट्रवादीचे खासदार पार्थ पवार यांनी सुनेत्रा पवारांविरोधा उमेदवार दिल्याबद्दल नंतर काँग्रेसची काय अवस्था होईल ते पहा असा इशार दिला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणाले की, राजकारणामध्ये अशा प्रकारचं वक्तव्य करण्यासाठी परिपक्वता लागले. राजकारणातील परिपक्वता पार्थ पवार यांच्याकडे आहे की नाही याची माहिती नाही. आज सुनेत्रा पवार अर्ज भरतानाही शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे कुणीही हजर नव्हते. तर सुनेत्रा पवारांना पाठींबा देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनील तटकरे, छगन भुजबळ, बावनकुळे, प्रफुल पटेल उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *