मुख्यमंत्री रोजगार योजनेत १११% उद्दिष्टपूर्ती ,१६ हजार युवकांना रोजगार

कोकण विभागाची उल्लेखनीय कामगिरी

नवी मुंबई : (अशोक गायकवाड )—महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेत कोकण विभागाने यंदा उल्लेखनीय कामगिरी करत १११.५७ टक्के उद्दिष्टपूर्ती साध्य केली आहे. या योजनेअंतर्गत एकूण ३ हजार ७४९ उद्योजकांना कर्ज मंजूर करण्यात आले असून, त्यातून सुमारे १६ हजारांहून अधिक युवकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. चालू आर्थिक वर्षात कोकण विभागाला ४,४५२ प्रकरणांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी जिल्हा उद्योग केंद्र यंत्रणेसाठी २,६७१ तर खादी व ग्रामोद्योग मंडळासाठी १,७८१ प्रकरणांचे उद्दिष्ट होते. प्रत्यक्षात मात्र ३,७४९ कर्जप्रकरणे मंजूर झाली असून, यात सुमारे ८४ कोटी रुपयांच्या अनुदानाचा समावेश आहे. विशेष म्हणजे, कोकण विभागाने सलग तिसऱ्यांदा १०० टक्क्यांहून अधिक उद्दिष्टपूर्ती करत आपली आघाडी कायम राखली आहे. जिल्हानिहाय कामगिरीत रत्नागिरी जिल्ह्याने १३०.६४ टक्के उद्दिष्टपूर्ती करून अव्वल स्थान पटकावले आहे. त्याखालोखाल रायगड जिल्ह्याने १००.५० टक्के, सिंधुदुर्गने १२३.३३ टक्के आणि पालघरने १०३.३० टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे. ठाणे जिल्ह्यानेही ६१.६५ टक्के कामगिरी नोंदवत विभागाच्या एकूण यशात आपला सहभाग नोंदविला आहे. मंजूर प्रकल्पांमध्ये ९१४ उत्पादन क्षेत्रातील तर २ हजार ८३५ सेवा क्षेत्रातील प्रकल्पांचा समावेश असून, यातील सुमारे ५० टक्के लाभार्थी महिला व मागासवर्गीय घटकांतील आहेत. यामुळे सामाजिक समावेशकतेलाही चालना मिळाली आहे. अनुदान वितरणात कोकण विभागाने ९३५ प्रकरणांद्वारे (२१ टक्के) राज्यात तिसरा क्रमांक मिळविला आहे. तसेच रत्नागिरी जिल्ह्याने ७३.७२ टक्के मार्जिन मनी दावे सादर करून विशेष कामगिरी बजावली आहे. या यशामागे विकास आयुक्त (उद्योग) दिपेंद्रसिंह कुशवाह यांचे नेतृत्व तसेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर व ठाणे येथील जिल्हाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले आहे. उद्योग सहसंचालक विजू सिरसाठ यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा उद्योग केंद्रांचे अधिकारी, बँक अधिकारी आणि संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम केल्यामुळे ही कामगिरी शक्य झाली आहे. योजनेची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक व सुलभ व्हावी यासाठी mah-cmegp.gov.in हे ऑनलाइन पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील अधिकाधिक युवकांनी पुढे येऊन उद्योग उभारावेत आणि स्वावलंबी व्हावे, असे आवाहन उद्योग सहसंचालकांनी केले आहे. दरम्यान, कोकण विभागाने विविध उद्योग प्रोत्साहन उपक्रम, निर्यात परिषद, ‘महाराष्ट्र इग्नाईट’, ‘एक्सपोर्ट कॉन्क्लेव्ह’ आदी कार्यक्रमांच्या माध्यमातून युवकांना उद्योगक्षेत्राकडे वळविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *