शहापूरच्या माळरानावर ग्रह-नक्षत्रांची फुले फुलली
 ठाणे जिल्ह्यातील पहिल्या तारांगणाचे शहापूरला उद्घाटन

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील पहिले तारांगण आणि अत्याधुनिक दुर्बिणीने सुसज्ज वेधशाळा शहापूर येथे उभारण्यात आली असून, खगोलप्रेमींसाठी हा एक मोठा आकर्षणबिंदू ठरणार आहे. निलेश ठाकूर, गिरीश ठाकूर आणि राज छेडा यांनी उभारलेल्या ‘सॅपो’ या खगोलकेंद्राचे उद्घाटन रविवारी (५ एप्रिल) सायंकाळी खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण आणि आमदार दौलत दरोडा यांच्या हस्ते संपन्न झाले.

या सोहळ्यास डॉ. विजय महाजन यांच्यासह अनेक खगोलप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आमदार दौलत दरोडा म्हणाले की, “ठाणे जिल्ह्यातील पहिले तारांगण माझ्या मतदारसंघात उभारले गेले, ही अभिमानाची बाब आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक ती सर्व मदत करण्यास मी सदैव तत्पर आहे.”

खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी आपल्या भाषणात आकाशाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, “आकाश हे एक उघडे पुस्तक आहे. इतर पुस्तके उघडावी लागतात, पण आकाश कायम उघडे असते. त्याचा अभ्यास करण्यासाठी कोणताही खर्च लागत नाही. या वेधशाळेमुळे शहापूर खगोल शिक्षणाचे केंद्र बनू शकते.” त्यांनी पुढे सांगितले की, या केंद्रात खगोलशास्त्राचा अभ्यासक्रम सुरू करून प्रात्यक्षिक प्रशिक्षण देण्याची व्यवस्था व्हावी, तसेच अंधश्रद्धा दूर करून वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागावा.

सोमण यांनी आमदारांकडे तारांगणापर्यंत जाणाऱ्या रस्त्याचा दर्जा सुधारण्याची आणि रेल्वे स्थानकापासून बससेवा सुरू करण्याची मागणीही केली. तसेच, महिन्यातून एक दिवस आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी मोफत शो आयोजित करण्याची विनंती ठाकूर बंधूंना केली.

उद्घाटनानंतर उपस्थितांना तारांगणातील आकर्षक शो दाखविण्यात आला. वेधशाळेचे छप्पर सरकत उघडताच अत्याधुनिक दुर्बिणीने आकाश निरीक्षण सुरू झाले. दा. कृ. सोमण यांनी लेझर पॉइंटरच्या सहाय्याने ध्रुव तारा, सप्तर्षी आणि विविध नक्षत्रांचे दर्शन घडविले. त्यानंतर दुर्बिणीतून गुरू ग्रह आणि त्याचे चार उपग्रह पाहण्याचा अनोखा अनुभव उपस्थितांना मिळाला.

या अनोख्या उपक्रमाबद्दल खगोलप्रेमींनी ठाकूर बंधूंचे अभिनंदन केले. शहापूरच्या माळरानावर त्यांनी अक्षरशः ग्रह-नक्षत्रांची बाग फुलवली असून, हा प्रकल्प भविष्यात खगोलशास्त्राच्या प्रसारासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *