भाईंदर पूर्व, येथील इंद्रलोक फेज ३ परिसरात काल रात्री सिलेंडर स्फोटामुळे घडलेली आगीची घटना केवळ एक अपघात नसून, तो महापालिका प्रशासन आणि महसूल विभागाच्या भ्रष्ट डोळेझाकपणाचा क्रूर परिणाम आहे. या भीषण दुर्घटनेत ३ जणांचा होरपळून मृत्यू झाला असून, या घटनेची माहिती मिळताच *महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली आणि पीडितांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्याचा निर्धार व्यक्त केला.
या दुर्दैवी घटनेत ज्या निष्पाप मुलांनी आणि व्यक्तीने आपला जीव गमावला, त्यांच्या कुटुंबाप्रती सहवेदना व्यक्त करत, त्यांना शासनाकडून योग्य ती आर्थिक मदत मिळावी यासाठी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रस्ताव सादर करणार असल्याचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी स्पष्ट केले. प्रशासकीय ढिसाळपणामुळे सामान्य जनतेचा बळी जाऊ देणार नाही आणि इंद्रलोक परिसरात चालणारे हे अवैध साम्राज्य मुळासकट उखडून टाकेपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असा ठाम निर्धार प्रताप सरनाईक यांनी यावेळी व्यक्त केले.सदर घटना घडलेला परिसर हा खाजगी मालकीचा असून तो कांदळवन क्षेत्रात येतो. नियमानुसार येथे कोणत्याही बांधकामाला परवानगी नसतानाही, भूमाफियांनी कांदळवनाची कत्तल करून येथे बेकायदेशीर वस्त्या वसवल्या आहेत. कमलेश गुप्ता नावाच्या व्यक्तीने येथे अवैधरित्या झोपड्या बांधून गरिबांकडून अव्वाच्या सव्वा भाडे उकळले, तसेच बेकायदेशीर बोअरवेल आणि वीज जोडण्याही पुरवल्या होत्या. तब्बल २३ सिलेंडरचा स्फोट होणे, हे या परिसरात चालणाऱ्या मोठ्या अवैध धंद्यांचे जिवंत उदाहरण आहे.या भीषण परिस्थितीवर संताप व्यक्त करत मंत्री प्रताप सरनाईक यांनी मीरा-भाईंदर महानगरपालिका आयुक्त आणि स्थानिक तहसीलदार यांची कडक शब्दांत कानउघडणी केली.”वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने या अवैध बांधकामांकडे दुर्लक्ष का केले? अधिकाऱ्यांच्या आशीर्वादामुळेच आज तीन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. याला सर्वस्वी जबाबदार इथले प्रशासन आहे,” अशा शब्दांत सरनाईक यांनी आपला रोष व्यक्त केला. तसेच, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आणि तात्काळ सर्व अवैध वस्त्यांवर बुलडोझर फिरवण्याचे निर्देश दिले आहेत.या दुर्घटनेत मृत पावलेले व्यक्ती हे पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशचे असल्याचे प्राथमिक दर्शनी दिसत असले तरी, ते बांगलादेशी घुसखोर किंवा रोहिंगे असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मीरा-भाईंदर शहरात वाढणारी ही घुसखोरी सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर असून, पोलिसांनी अशा बेकायदेशीर झोपडपट्ट्यांची झाडाझडती घेऊन घुसखोरांवर तात्काळ कारवाई करावी, अशा कडक सूचना मंत्री सरनाईक यांनी पोलीस प्रशासनाला दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *