राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धा
नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशनच्यावतीने ६० वी सिनियर महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धा २०२६-२०२७ , १३ ते १६ एप्रिल २०२६ दरम्यान नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशन, सेक्टर १-ए, वाशी, नवी मुंबई येथे संपन्न होत आहे. पुरुष एकेरी, महिला एकेरी, पुरुष वयस्कर एकेरी व महिला वयस्कर एकेरी अशा चार गटात मिळून एकंदर ४८६ स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. पुरुष एकेरी गटात मुंबईच्या विश्व् विजेत्या प्रशांत मोरे तर महिला एकेरी गटात ठाण्याच्या समृद्धी घाडिगावकरला प्रथम मानांकन देण्यात आले आहे. नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष, जिल्ह्याचे पालक मंत्री व राज्याचे वन मंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते १३ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९ वाजता स्पर्धेचे उदघाटन करण्यात येणार असून त्यानंतर पुरुष व महिला सांघिक गट आणि पुरुष वयस्कर एकेरी गटाच्या सामान्यांनी स्पर्धेची सुरुवात होईल अशी माहिती नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशनचे सचिव विजय आर. पाटील यांनी दिली. नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशनचे उपाध्यक्ष विजय एस. पाटील, राज्य कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष जितेंद्र शाह व कार्याध्यक्ष भारत देसडला या प्रसंगी उपस्थित राहणार आहेत. एकंदर २ लाखांची रोख पारितोषिके व चषक नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिशनतर्फे विजेत्यांना देण्यात येणार आहेत. महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या युट्युब चॅनेलवरून स्पर्धेच्या सामान्यांचे थेट प्रसारण करण्यात येईल. शिवाय मराठी, हिंदी व इंग्रजीमधून या सामन्यांचे धावते समालोचन किशोर वागळे करणार आहेत. आंतर राष्ट्रीय पंच केतन चिखले व आशिष बागकर हे प्रमुख पंचांची भूमिका बजावतील. तर तांत्रिक संचालक म्हणून आंतर राष्ट्रीय पंच अजित सावंत यांची नियुक्ती महाराष्ट्र कॅरम असोसिएशनने केली आहे. महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे साहित्य पार्टनर असलेल्या सिस्का कंपनीचे एकंदर ३२ बुलेट शॉट कॅरम बोर्ड व बुलेट शॉट सोंगट्यांचा वापर या स्पर्धेत करण्यात येणार आहे.
स्पर्धेतील मानांकन पुढील प्रमाणे.
पुरुष एकेरी : १) प्रशांत मोरे ( मुंबई ), २) झैद अहमद फारुकी ( ठाणे ), ३) सागर वाघमारे ( पुणे ), ४) महम्मद घुफ्रान ( मुंबई ), ५) अभिजित त्रिपनकर ( पुणे ), ६) विकास धारिया ( मुंबई ), ७) संदीप दिवे ( जळगाव ), ८) संजय मांडे ( ठाणे )
महिला एकेरी : १) समृद्धी घाडीगावकर ( ठाणे ), २) आकांक्षा कदम ( रत्नागिरी ), ३) मिताली पाठक ( मुंबई ), ४) अंबिका हरिथ ( मुंबई ), ५) केशर निर्गुण ( सिंधुदुर्ग ), ६) रिंकी कुमारी ( मुंबई ), ७) सोनाली कुमारी ( मुंबई ), ८) प्राजक्ता नारायणकर ( मुंबई उपनगर )
पुरुष वयस्कर एकेरी : फय्याज शेख ( पुणे ), २) सत्यनारायण दोंतुल्ला ( मुंबई ), ३) हेमंत पांचाळ ( मुंबई ), ४) संजय थिटे ( पुणे ),
महिला वयस्कर एकेरी : १) मिनल लेले खरे ( ठाणे ), २) शोभा कामात ( कोल्हापूर ), ३) रोझिना गोदाद ( मुंबई ), ४) माधुरी तायशेटे ( मुंबई उपनगर )
पुरुष सांघिक गट : १) मुंबई, २) पुणे, ३) ठाणे, ४) मुंबई उपनगर
महिला सांघिक गट : १) मुंबई, २) ठाणे, ३) पुणे, ४) पालघर
००००००००००
