सुरांचा ‘साज’ हरपला…
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन
संपदा सावंत
मुंबई – सप्तसुरांना आपल्या स्वर्गीय आवाजाने ‘साज’ चढवणाऱ्या ‘स्वरसाम्राज्ञी’ ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. शनिवारी त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. फुफ्फुसाचा आजार आणि वयोमानानुसार उद्भवलेल्या इतर व्याधींशी त्या झुंज देत होत्या. ‘अनेक अवयव निकामी झाल्यामुळे त्यांचे निधन झाले असलायची माहिती ब्रीच कँडी रुग्णालयातील डॉक्टर प्रतीत समदानी यांनी दिली. त्यांच्या निधनाने संपूर्ण मनोरंजन आणि संगीतविश्वात शोककळा पसरली असून चाहत्यांकडून हळहळ व्यक्त होत आहे.
8 सप्टेंबर 1933 रोजी जन्मलेल्या आशा भोसले यांनी 1943 मध्ये अवघ्या 10 व्या वर्षी गायन क्षेत्रात पदार्पण केले. मराठी, हिंदीसह अनेक भारतीय व परदेशी भाषांमध्ये त्यांनी प्रेमगीत, गझल, भावगीत, भजन, लावणी, कव्वाली, डिस्को ते रिमिक्स अशा विविध प्रकारची गाणी गायली. त्यांच्या गायनातील वैविध्य हेच त्यांचे वैशिष्ट्य मानले जाते.
हंसराज बहल, ओ. पी. नय्यर, मदन मोहन, आर. डी. बर्मन, इलैयाराजा, अनु मलिक ते ए. आर. रहमान यांसारख्या नामवंत संगीतकारांसोबत त्यांनी काम केले. तसेच मोहम्मद रफी, मुकेश, किशोर कुमारपासून ते आंतरराष्ट्रीय कलाकारांपर्यंत अनेकांसोबत त्यांनी गाणी सादर केली. 1995 मध्ये उस्ताद अली अकबर खान यांच्यासोबतच्या अल्बमसाठी त्यांना ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकनही मिळाले होते.
आशा भोसले यांच्या नावावर एक-दोन नव्हे, तर तब्बल २० वेगवेगळ्या भाषांमध्ये १२,००० हून अधिक गाणी गाण्याचा जागतिक विक्रम आहे. यासाठी त्यांची नोंद ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये करण्यात आली आहे. त्यांनी केवळ मराठी आणि हिंदीच नाही, तर इंग्रजी, रशियन, नेपाळी, मल्याळम, तमिळ अशा अनेक भाषांमध्ये आपली जादू पसरवली आहे. महाराष्ट्र भूषण सारखे अनेक मोठे पुरस्कार त्यांना मिळाले.
प्रमुख पुरस्कार
पद्म विभूषण – २००८, दादासाहेब फाल्के पुरस्कार – २०००, राष्ट्रीय फिल्म पुरस्कार (सर्वश्रेष्ठ महिला प्लेबैक गायिका) – १९८१ और १९८६, फिल्मफेयर पुरस्कार (सर्वश्रेष्ठ महिला प्लेबैक गायिका) – १९६८, १९६९, १९७२, १९७३, १९७४, १९७५ और १९७९, फिल्मफेयर स्पेशल अवॉर्ड (फिल्म “रंगीला”) – १९९६, फिल्मफेयर लाइफटाइम अचीवमेंट अवॉर्ड – २००१, आयफा अँवार्ड (सर्वश्रेष्ठ महिला प्लेबैक गायिका) – २००२ फिल्म “लगान” चे गीत “राधा कैसे न जले” साठी, नाइटिंगेल ऑफ एशिया अवॉर्ड – १९८७, सिंगर ऑफ द मिलेनियम – २००० (दुबई), बीबीसी लाइफटाइम अचीवमेंट अवॉर्ड – २००२.
