आशाताईंनी सांस्कृतिक वारसा समृद्ध केला- मोदी

मुंबई : “भारतातील सर्वात ख्यातनाम आणि अष्टपैलू आवाजांपैकी एक असलेल्या आशा भोसले जी यांच्या निधनाने अतिशय दुःख झाले. त्यांच्या अनेक दशकांच्या अद्वितीय संगीत प्रवासाने आपल्या सांस्कृतिक वारशाला समृद्ध केले आणि जगभरातील असंख्य लोकांच्या मनाला स्पर्श केला. भावपूर्ण गीतांपासून ते जोशपूर्ण संगीत रचनांपर्यंत, त्यांच्या आवाजात कालातीत तेज होते. त्यांच्याशी झालेल्या संवादांच्या आठवणी मी सदैव जपून ठेवेन. त्यांच्या कुटुंबीयांना, चाहत्यांना आणि संगीतप्रेमींना माझ्या भावपूर्ण संवेदना. त्या पुढील पिढ्यांना प्रेरणा देत राहतील आणि त्यांची गाणी सदैव लोकांच्या आयुष्यात गुंजत राहतील”, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

आशाताईंचा आवाज म्हणजे संगीताचा आत्मा होता – फडणवीस 

तीन वर्षांपूर्वी धडाक्यात नव्वदी साजरी करणार्‍या ज्येष्ठ गायिका, पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण आशा भोसले यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दु:खद आहे. त्यांच्या निधनाने मंगेशकर घराण्यातील लतादीदींनंतर आणखी एक तारा निखळला आहे. सुरांची सुंदर बाग आज उजाड झाली. आशाताईंचा आवाज म्हणजे संगीताचा आत्मा होता. गायनातील बारमाही हिरवा ऋतू आणि भावभावनांचा सुरेल असा महासागर म्हणजे आशाताई अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहीली.

आशाताईंच्या जाण्याने संगीताचा सुवर्णकाळ हरपला – एकनाथ शिंदे

भारतीय संगीत सृष्टीतील अढळ ध्रुवतारा आणि आपल्या सुरावलींनी अवघ्या जगाला मोहिनी घालणाऱ्या ‘पद्मविभूषण’, महाराष्ट्र भूषण आशा भोसले यांच्या निधनामुळे देशाने एक महान स्वरसम्राज्ञी गमावली आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

सुरांची ‘सम्राज्ञी’ काळाच्या पडद्याआड – सुनेत्रा पवार

मुंबई : ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनाने संगीत क्षेत्रातील एका सुवर्णयुगाचा अंत झाला असून, सुरांची ‘सम्राज्ञी’ काळाच्या पडद्याआड गेली आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी श्रद्धांजली वाहीली.

अजरामर आवाज हरपला- शरद पवार

“आशाताईंच्या रूपाने भारतीय संगीतविश्वातील अजरामर आवाज हरपला आहे. त्यांच्या निधनामुळे संगीताच्या एका सुवर्णयुगाला विराम मिळाला आहे. त्यांच्या आवाजातली खुमारी, चपळता आणि भावनांची खोली ही त्यांची खरी ओळख ठरली. हिंदीसह मराठी, बंगाली, गुजराती, पंजाबी आणि अनेक भाषांमध्ये हजारो गाणी गाऊन तब्बल सहा दशकांहून अधिक काळ त्यांनी भारतीय संगीतविश्वासाठी दिलेले योगदान अमूल्य आहे. आज त्यांचा आवाज थांबला असला, तरी त्यांचे सूर सदैव घुमत राहतील. आशाताई भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली”, अशा शब्दांत शरद पवार यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *