अलविदा आशाताई…सुरांचा ‘साज’ पंचतत्वात विलीन
स्लग – उरले उरात काही आवाज चांदण्यांचे,
आकाश तारकांचे उचलून रात गेली
स्वाती घोसाळकर
मुंबई : उरले उरात काही आवाज चांदण्यांचे , आकाश तारकांचे उचलून रात गेली या केव्हातरी पहाटेच्या गीतातील ओळींना उजाळा देत सुरांचा ‘साज’ आशाताईंच्या रुपाने पंचतत्वात विलीन झाला. करोडो भारतीयांच्या हृदयात आपला स्वरांचे चांदणे शिंपून आशाताईंनी इहलोकीचा आज निरोप घेतला. संपूर्ण देशानं साश्रू नयनांनी सूरसम्राज्ञी आशा भोसले यांना अखेरचा निरोप दिला.
शासकीय इतमामात आशाताईंच्या पार्थिवावर दुपारी 4 वाजता शिवाजी पार्क इथल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
आशा भोसले यांच्या लोअर परेल इथल्या निवासस्थानी त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलेलं. राजकारणी, सिनेसृष्टी, क्रीडा आणि उद्योग क्षेत्रातील तारकांनी आशाताईंना अखेरचा निरोप देण्यासाठी एकच गर्दी केली होती. आशाताईंना निरोप देताना सचिन तेंडुलकर यांना अश्रु अनावर झाले होते. राज्यपाल जिष्णू देव शर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांच्यासह उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, राज ठाकरे, अभिनेत्री तब्बू, आशा पारेख, रितेश देशमुख, गायक सुदेश भोसले, राकेश रोशन, नीना गुप्ता, मंगलप्रभात लोढा आणि भय्याजी जोशी, सुप्रिया सुळे, आशिष शेलार, , उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे तसंच विश्वास नांगरे-पाटील यांनी त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं.
भारतरत्न आणि ‘गानसम्राज्ञी’ लता मंगेशकर यांची लहान बहीण असलेल्या आशा भोसले यांना हिंदी सिनेसृष्टीची वर्सटाईल गायिका म्हणून ओळखल जायचं. तब्बल सहा दशकं त्यांनी इंडस्ट्रीत आपल्या गाण्यांना आवाज दिलाय. त्यांनी केवळ हिंदीतच नाहीतर, मराठी, बंगाली, गुजराती, तमिल, तेलुगुसह अनेक भाषांमध्ये गाणी गायलीत. हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज संगीतकार आरडी बर्मन, ओपी नैय्यर, सचिन देव बर्मन, लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्यासोबत त्यांनी अनेक अजरामर गाणी गायली.
