मुंबई : भारतीय जनता पक्षाचे सरकार फक्त अदानी अंबानीसाठी असून देश विकण्याचे काम बिनबोभाट सुरु आहे. सरकारकडे कोणतेही निश्चित धोरण, नियोजन व आर्थिक शिस्त नसल्याने अनेक प्रकल्प वेळेत पूर्ण होत नाहीत. इंदू मील मधील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासही भाजपा सरकारच्या वेळेकाढूपणाचा फटका बसला आहे. सरकारची इच्छाशक्ती व मानसिकताच नसल्याने स्मारकाचे काम रखडले आहे, असा हल्लाबोल करत डॉ. बाबासाहेबांचे स्मारक हे केवळ एक बांधकाम नसून कोट्यवधी लोकांच्या स्वाभिमान आणि अस्मितेचा प्रश्न आहे, बाबासाहेबांच्या अनुयायांच्या सहनशिलतेचा अंत पाहू नका, असा इशारा मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी दिला आहे.
यासंदर्भात बोलताना खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, भाजपा महापुरुषांचा वापर फक्त व्होट बँकेसाठी करत आहे. अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक करण्याची घोषणा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जलपूजनही केले, जवळपास १० वर्षे झाली या स्मारकाची एक विटही रचली नाही.  इंदू मील मधील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचीही तशीच अवस्था आहे. मागील अनेक वर्षांपासून या स्मारकाचे काम सूरुच आहे, सरकार ‘तारीख पे तारीख’ देत  आहे, आता पुन्हा या स्मारकासाठी वेळ वाढवण्यात आली आहे. सरकारची इच्छाशक्ती असती तर आज ही वेळ आली नसती. राज्यात कोट्यवधींचे प्रकल्प धडाधड जाहीर होतात, उद्घाटनं होतात, त्याचं मोठं मार्केटिंग केलं जातं पण महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा प्रश्न आला की कायम विलंब आणि मुदतवाढ दिली जाते.
महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अत्यंत महत्त्वाच्या आणि भावनिक प्रकल्पास विलंब होणे हे संतापजनक आहे. कधी तांत्रिक कारणे, कधी प्रशासनिक अडचणी, तर आता युद्धाचा परिणाम, प्रत्येक वेळी नवे कारण पुढे करून जनतेची दिशाभूल केली जात आहे. हा प्रकल्प केवळ एक बांधकाम नसून कोट्यवधी लोकांच्या स्वाभिमानाशी आणि अस्मितेशी जोडलेला आहे. जर नियोजन योग्य असते, तर बाह्य परिस्थितींचा परिणाम इतका मोठा झाला नसता. सरकारने आता कारणे देणे बंद करून ठोस कृती आणि वेळबद्ध अंमलबजावणीवर भर द्यावा, असेही खासदार वर्षा गायकवाड  म्हणाल्या..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *