उद्घाटन सोहळा बित्तंबातमीच्या राजकीय संपादक स्वाती घोसाळकर व प्रशिक्षक नौशाद खान यांच्या हस्ते संपन्न
मुंबई : रत्नदीप स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने आयोजित पुरुष/महिला टी-२० क्रिकेट स्पर्धा २०२६-२७ ला आज १३ एप्रिल रोजी चर्चगेट येथील क्रॉस मैदानावर उत्साहात सुरुवात झाली. सकाळी ९ वाजता पार पडलेल्या उद्घाटन सोहळ्याला क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली.
या स्पर्धेचे उद्घाटन प्रतिष्ठित क्रीडा पत्रकार आणि बित्तंबातमीच्या राजकीय संपादक तसेच मुंबई पत्रकार संघाच्या उपाध्यक्षा स्वाती घोसाळकर तसेच नामांकित क्रिकेट प्रशिक्षक नौशाद खान यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रत्नदीप स्पोर्ट्स असोसिएशनचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी दोन सामने रंगले. पहिला सामना एमटीएनएल आणि ॲडव्हान्स सी.सी. यांच्यात झाला. ॲडव्हान्स सी.सी. ने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत १५० धावांचे आव्हान उभे केले. प्रत्युत्तरात एमटीएनएल संघाने उत्कृष्ट फलंदाजी करत १६.२ षटकांत लक्ष्य गाठले आणि विजय मिळवला. या सामन्यात शुभम जाधव याने नाबाद ५३ धावांची खेळी करत सामनावीराचा मान पटकावला.
दुसरा सामना अशोक कामत क्रिकेट अकॅडेमी आणि एस.व्ही.एस. चेंबूर यांच्यात झाला. एस.व्ही.एस. चेंबूरने नाणेफेक जिंकून प्रतिस्पर्ध्याला प्रथम फलंदाजीस आमंत्रित केले. अशोक कामत क्रिकेट अकॅडेमीने २० षटकांत १४८ धावा केल्या. मात्र, एस.व्ही.एस. चेंबूरने प्रभावी गोलंदाजी करत प्रतिस्पर्धी संघाचा डाव १४ षटकांत गुंडाळत विजय संपादन केला. मान्स चव्हाण याने २ षटकांत ९ धावा देत ३ बळी घेत उत्कृष्ट कामगिरी करत सामनावीराचा किताब मिळवला.
स्पर्धेच्या उद्घाटन दिवसापासूनच खेळाडूंचा उत्साह, स्पर्धात्मकता आणि उत्कृष्ट खेळ पाहायला मिळत असून पुढील सामनेही तितकेच रंगतदार होणार असल्याचे चित्र आहे.
