कल्याण : कल्याणच्या आचार्य अत्रे रंगमंदिर येथे शनिवारी पार पडलेल्या हिंदी चित्रपट गीत संगीताच्या रंगारंग कार्यक्रमात नेत्रदान, देहदानाबद्दलचे आवाहन उपस्थित गानरसिकांच्या संवेदनशीलेतेला स्पर्शून गेल्याचे पाहायला मिळाले. ‘शरद कराओके ॲण्ड लाईव्ह म्युझिक’ यांच्या माध्यमातून प्रमुख गायक निलेश निरगुडकर व मोना कामत-प्रभूगावकर यांच्यासह अन्य गायक गायिकांच्या गायनाच्या मेरी आवाजही पहचान है या गीत-संगीताच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रम प्रसंगी आयोजक शरद ननावरे यांनी आपल्या मुलाच्या डोळ्याच्या शस्त्रक्रियेबाबतची गुंतागुंत याबाबतची माहिती देताना सर्वांना नेत्रदान, अवयवदानाचे महत्व विषद करुन सुंदर शरीराची राख करण्यापेक्षा कुणाच्या तरी आपले अवयव उपयोगी पडतील याकडे डोळसपणे पाहण्याचे आवाहन केले. प्रमुख गायक गायिका यांच्यासह अंध विद्यार्थ्यांसाठी ब्रेल लिपीतील ३२ पुस्तकांचे लेखक असलेले पत्रकार राजेंद्र घरत यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाच्या उत्पन्नातून जमा झालेल्या निधीतील ५१ हजाराची रक्कम ननावरे यांनी धनादेश स्वरुपात अंधशाळेला देत  असल्याची घोषणा केली.
यावेळी सत्यम शिवम सुंदरम, शोखियों में घोला जाए, अजहु ना आये बालमा, ए भाय जरा देख के चलो, दिल चीज क्या है आप मेरी जान लिजिए, परदा है परदा, आजा शाम होने आयी, आके तेरी बाहोमे हर शाम लगे सिंदूरी, राफ्ता राफ्ता  देखो, होठो पे ऐेसी बात अशी हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णयुगातील गाणी सादर करुन प्रेक्षकांना खुश करण्यात आले. प्रमुख गायकांसह स्वतः शरद ननावरे तसेच आशालता, डॉली, शैलजा, चेतना, मिहीर, नरेंद्र, अमर यांनीही चांगली गाणी गात रसिकांची वाहव्वा मिळवली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *