Skip to content
चैत्यभूमीवरील
अभिवादनासाठी
प्रशासन सज्ज
मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दादर येथील चैत्यभूमीवरीस अभिवादनासाठी येणाऱ्या लाखो अनुयायांच्या स्वागतासाठी महाराष्ट्र प्रशासन, मुंबई महापालिका व पोलिस प्रशासन पूर्णतः सज्ज आहे. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे चैत्यभूमीवर अभिवादनासाठी उपस्थित राहणार आहेत.
चैत्यभूमी परिसरात नागरी सुविधा पुरविण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. जी/उत्तर विभागातर्फे चैत्यभूमी, शिवाजी पार्क व आसपासच्या परिसरात सुरक्षा, आरोग्य आणि स्वच्छतेची व्यापक तयारी करण्यात आली असून संपूर्ण यंत्रणा तैनात करण्यात आली आहे.
सुरक्षेच्या दृष्टीने परिसरात स्वतंत्र नियंत्रण कक्ष उभारण्यात आला असून उंच टेहळणी मनोरेही उभारले आहेत. याशिवाय ३२ सीसीटीव्ही कॅमेरे, २० मेटल डिटेक्टर आणि ३० हँडहेल्ड मेटल डिटेक्टर बसविण्यात आले आहेत.
उन्हापासून संरक्षणासाठी अनुयायांसाठी सुमारे ५०० मीटर अंतरावर दुतर्फा पडदे लावण्यात आले आहेत. आरोग्य सेवांसाठी ३० वैद्यकीय अधिकारी आणि ७० सहाय्यक कर्मचारी तीन शिफ्टमध्ये कार्यरत राहणार असून पाच रुग्णवाहिका, एक अतिदक्षता रुग्णवाहिका तसेच दादर चौपाटीवर सुरक्षेसाठी रेस्क्यू बोटही सज्ज ठेवण्यात आली आहे.