विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा


हरिभाऊ लाखे
नाशिक – महाराष्ट्र शासनाच्या ‘निपुण महाराष्ट्र’ अभियानातंर्गत शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात मागील महिन्यात (फेब्रुवारी ते मार्च) शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय व ऐतिहासिक प्रगती नोंदविण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या ‘लक्षित उपचारात्मक अध्यापन’ आणि ‘१०० दिवस वाचन मोहीम’च्या प्रभावी अंमलबजावणीमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत लक्षणीय वाढ झाली असून ‘सुपर निपुण’ शाळांच्या संख्येत तब्बल पाचपट वाढ झाली आहे.
जिल्हा मूल्यांकन अहवालानुसार, सध्या जिल्ह्यातील १,३९,७०१ विद्यार्थी ‘निपुण’ श्रेणीत पोहोचले असून, केवळ एका महिन्यात ५५,९९० नव्या विद्यार्थ्यांची भर पडली आहे. ही वाढ जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रातील सकारात्मक बदलाचे द्योतक मानली जात आहे. आकडेवारीनुसार, ‘सुपर निपुण’ शाळांची संख्या २३३ वरून थेट १,११३ पर्यंत वाढली आहे, तर ‘निपुण’ शाळांची संख्या ३५३ वरून १,४७१ पर्यंत पोहोचली आहे. विशेष म्हणजे, अत्यंत कमी कामगिरी असलेल्या १३१ पैकी ९७ शाळांनी (७४ टक्के) आपली गुणवत्ता सुधारून ‘निपुण’ श्रेणी प्राप्त केली आहे. हे यश जिल्हा प्रशासन, शिक्षक व विद्यार्थ्यांच्या एकत्रित प्रयत्नांचे फलित आहे.
या यशामागे जिल्हा परिषदेने राबवलेली ‘पंचसूत्री’ रणनीती महत्त्वाची ठरली आहे. यामध्ये उपचारात्मक स्तराधारित कृतीपुस्तिकांचे वितरण, वाचन संस्कृतीला चालना देणारी ‘१०० दिवस वाचन मोहीम’, प्रशासकीय उत्तरदायित्व निश्चिती, विद्यार्थी व अधिकाऱ्यांमधील थेट संवाद आणि क्षेत्रीय पातळीवरील नियमित भेटी यांचा समावेश आहे. उपचारात्मक शिक्षण उपक्रमांतर्गत ५,६२५ विद्यार्थ्यांना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्या माध्यमातून ‘उपचारात्मक संच’ उपलब्ध करून देण्यात आले. भाषा आणि गणित विषयांसाठी दररोज एक तास स्वतंत्र वेळ देण्यात आल्याने विद्यार्थ्यांच्या मूलभूत कौशल्यांमध्ये सुधारणा दिसून आली.
‘१०० दिवस वाचन मोहीम’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी व्हॉट्सॲप चॅनेलद्वारे दररोज दोन डिजिटल पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रशासकीय पातळीवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी गटशिक्षणाधिकारी आणि केंद्रप्रमुख यांच्या विशेष बैठका घेऊन कामाचे उत्तरदायित्व निश्चित करण्यात आले. तसेच, आव्हानात्मक भागातील विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दररोज विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. याशिवाय विस्तार अधिकारी आणि केंद्रप्रमुख यांच्या माध्यमातून शाळांना नियमित भेटी देऊन प्रत्यक्ष कामाचा आढावा घेण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *