मिरा-भाईंदरच्या विकासाचा मार्ग मोकळा करा – प्रताप सरनाईक

मिरा-भाईंदर : मुंबईच्या वेशीवर असलेल्या आणि झपाट्याने विस्तारणाऱ्या मिरा-भाईंदर शहराचा रखडलेला विकास पुन्हा रुळावर आणण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आक्रमक पाऊले उचलली आहेत. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला विकास आराखडा अद्याप अंतिम न झाल्याने अनेक विकासकामे रखडली असून, नागरिकांना त्याचा थेट फटका बसत आहे. शहराची वाढती लोकसंख्या आणि प्रलंबित नागरी प्रकल्प लक्षात घेता, महानगरपालिकेचा ‘सुधारीत विकास आराखडा’ (DP) शासन स्तरावर तातडीने अंतिम करावा, अशी आग्रही मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

मिरा- ईंदर शहराची मूळ विकास योजना १९९७ आणि २००० मध्ये मंजूर झाली होती. वाढत्या गरजा लक्षात घेऊन १५ ऑक्टोबर २०१५ रोजी सुधारीत आराखड्याचा इरादा घोषित करण्यात आला. २८ ऑक्टोबर २०२२ रोजी प्रारूप आराखडा प्रसिद्ध करून हरकती व सूचनांची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. २५ ऑक्टोबर २०२३ पासून हा अंतिम आराखडा शासनाच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.

प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे की, या आराखड्यामध्ये शहराच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे प्रकल्प प्रस्तावित आहेत, ज्यात प्रामुख्याने समाविष्ट दहिसर ते मिरा-भाईंदर लिंक रोड आणि वॉटर वर्क्ससाठीची आरक्षणे, मेट्रो लाईन १० साठीची आवश्यक आरक्षणे, सूर्या धरणातून पाणीपुरवठ्यासाठीच्या टाक्यांचे नियोजन, फाउंटन हॉटेल ते गायमुख या ३० मीटर रस्त्याचे ६० मीटर रुंदीकरण यांचा समावेश आहे. पत्राद्वारे सरनाईक यांनी खंत व्यक्त केली की, महायुती सरकारने शहराच्या विकासासाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे, मात्र विकास आराखडा अंतिम न झाल्याने या निधीचा विनियोग करता येत नाही. “काही लोकप्रतिनिधी स्वतःच्या स्वार्थासाठी या आराखड्याच्या मंजुरीमध्ये जाणीवपूर्वक अडथळे निर्माण करत आहेत, त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे नुकसान होत असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. ‘सुमारे १५ लाख लोकसंख्या असलेल्या या शहराचे नागरी प्रकल्प आणि शासनाची विकासकामे मार्गी लावण्यासाठी हा आराखडा अंतिम होणे ही काळाची गरज आहे. मुख्यमंत्री यावर सकारात्मक निर्णय घेऊन मिरा-भाईंदरच्या विकासाला हिरवा कंदील दाखवतील’, असा विश्वास प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या पत्रातून त्यांनी मिरा-भाईंदरच्या नियोजित विकासासाठी पुन्हा एकदा कंबर कसली असल्याचे दिसते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *