कृती आराखड्याची नवी मुंबई महानगरपालिका प्रभावी अंमलबजावणी करणार
नवी मुंबई : स्वच्छतेचा आणि आरोग्याचा परस्पर संबंध लक्षात घेऊन स्वच्छ भारत मिशनच्या वतीने ‘स्वच्छ सर्वेक्षण 2024’ अंतर्गत स्वच्छता अंगिकारुया, आजारपण पळवूया ही संकल्पना नजरेसमोर ठेवून ‘सफाई अपनाओ – बिमारी भगाओ’ हे अभियान 1 जुलै ते 31 ऑगस्ट 2024 या कालावधीत जाहीर करण्यात आले आहे. या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेने वेगवेगळे उपक्रम राबविण्यास नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या आधीपासूनच सुरुवात केली आहे.
याबाबत करावयाच्या कामांचा कृती आराखडा तयार करण्यात आला असून त्याची अंमलबजावणी करताना घनकचरा व्यवस्थापन व आरोग्य विभाग यांच्यासोबत सर्वच विभागांनी सक्रीय सहभाग घ्यावा असे निर्देश महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी या अभियानाच्या आढावा बैठकीप्रसंगी दिले.
या अभियानांतर्गत विशेष स्वच्छता मोहीमांचे आयोजन, कचरा संकलन आणि वाहतुकीचे नियोजन, सार्वजनिक व सामुदायिक शौचालयांची नियमित स्वच्छता, विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छताविषयक जागरूकता व त्यांच्या प्रत्यक्ष सहभागावर भर, शुध्द जलाच्या नियमित चाचण्या, स्वच्छ व शुध्द पाण्याचा पुरवठा आणि पाणीपुरवठा यंत्रणेची देखभाल, आरोग्याच्या दृष्टीने संवेदनशील क्षेत्रामध्ये विशेष लक्ष आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना, स्वच्छता व पावसाळी कालावधीत घ्यावयाच्या आरोग्य विषयक दक्षतेबाबत जनजागृती व माहिती प्रसार, पीपीटी अर्थात आरोग्य विषयक संरक्षण प्रतिबंध व उपचार अंमलबजावणी अशा प्रकारची कार्यवाही करण्यात येणारे आहे.
विभागांचे सहा.आयुक्त तथा विभाग अधिकारी हे स्वच्छता अभियानाचे केंद्रीय अधिकारी असणार असून आपापल्या विभागातील स्वच्छतेला प्राधान्य देण्याचे काम करण्यात त्यांची भूमिका महत्वाची असेल असे आयुक्तांनी स्पष्ट केले. प्रत्येक विभागासाठी नेमलेल्या पालक अधिकाऱ्यांनीही आपापल्या विभागात स्वच्छता कार्यवाहीकडे बारकाईने लक्ष दयावे अशाही सूचना देण्यात आल्या.
यादृष्टीने आठही विभाग कार्यालय क्षेत्रात दुर्लक्षित जागांची स्वच्छता करण्यासाठी विशेष मोहीम राबवावी व त्यामध्ये स्थानिक नागरिकांना मोठया प्रमाणावर सहभागी करुन घ्यावे असे आयुक्तांनी निर्देशित केले. स्वच्छतेबाबत जागरुकता वाढविण्यासोबतच विभागांमध्ये निकोप स्पर्धा व्हावी व यामधून शहर स्वच्छतेचा स्तर उंचवावा यादृष्टीने विभाग कार्यालयांमध्ये आंतरविभागीय स्वच्छता स्पर्धा घेण्यात येईल असे आयुक्तांनी सांगितले. या स्पर्धेत मार्केट्सची स्वच्छता, शाळा व महाविदयालयांतील स्वच्छता, बसस्टँड – हॉटेल्स – पेट्रोल पंप – वाणिज्य संकुले व आस्थापना अशा प्रकारची सार्वजनिक वर्दळीची ठिकाणांवरील स्वच्छता, सार्वजनिक उदयानांची स्वच्छता अशा निकषानुसार त्रयस्थ परीक्षणाव्दारे निवड करण्यात येईल असे ते म्हणाले.
मार्केट्स प्लास्टिकमुक्त करणे हे आपले प्रमुख उद्दीष्ट असून प्लास्टिक पिशव्यांना पर्याय म्हणून नागरिकांना चांगल्या दर्जाच्या कापडी पिशव्या उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने कार्यप्रणाली तयार करावी व त्याची त्वरीत अंमलबजावणी करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. कापडी पिशव्या निर्मिती प्रक्रियेत नमुंमपा क्षेत्रातील महिला बचत गटांना सहभागी करुन घ्यावे असेही त्यांनी निर्देश दिले. नागरिकांनी प्लास्टिक पिशव्या न वापरता कापडी पिशव्यांचा वापर करावा यादृष्टीने त्यांची मनोभूमिका तयार करण्यासाठी सातत्याने जनजागृती करण्यावर भर देण्याची सूचना करण्यात आली. यासोबतच किरकोळ बाजारात प्लास्टिक पिशव्या येऊच नयेत याकरिता कार्यप्रणाली राबविण्याच्या दृष्टीनेही ठोस पावले उचलावीत असे आयुक्तांनी सांगितले.
सोसायटयांमधील कचरा वर्गीकरणावर भर दयावा. त्यादृष्टीने सोसायटयांमध्ये जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधावा व त्यांच्या घरापर्यंत पोहोचून जनजागृती करावी आणि स्वच्छतेविषयी त्यांचे अभिप्राय घ्यावेत व सूचना जाणून घ्याव्यात तसेच ही कार्यवाही अत्यंत व्यापक स्वरुपात राबवावी असेही निर्देश आयुक्तांनी दिले.
आपल्या अधिकारी, कर्मचा-यांचा स्वच्छता कार्यात प्राधान्याने सहभाग असावा यादृष्टीने नमुंमपाचे अधिकारी, कर्मचारी ज्या सोसायटयांमध्ये राहतात त्या सोसायटयांमध्ये स्वच्छता विषयक बाबींची अंमलबजावणी करण्यात यावी व त्याच्या अंमलबजावणीकडे संबंधित विभागांच्या विभागप्रमुखांनी लक्ष दयावे असेही निर्देश देण्यात आले.
प्रत्येक विभागात होणाऱ्या स्वच्छताविषयक उपक्रमांना सर्व प्रसार माध्यमांतून व महानगरपालिकेच्या समाज माध्यमांतून व्यापक प्रसिध्दी दयावी जेणेकरुन इतरांनाही त्यापासून प्रेरणा मिळेल असे निर्देशित करीत ज्या सोसायटयांमध्ये स्वच्छताविषयक चांगले काम होत आहे त्यांना प्रसिध्दी देऊन प्रोत्साहीत करावे अशाही सूचना आयुक्तांनी केल्या.
या बैठकीस अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार, अतिरिक्त आयुक्त तथा शहर अभियंता श्री.शिरीष आरदवाड तसेच संबंधित विभागप्रमुख, विभागांचे पालक अधिकारी, सहा.आयुक्त तथा विभाग अधिकारी, कार्यकारी अभियंता व स्वच्छता अधिकारी उपस्थित होते.
आठही विभाग कार्यालय क्षेत्रात सुरु असलेल्या स्वच्छता विषयक कामगिरीचा विभागनिहाय आढावा घेण्यासोबतच आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी विभागांमध्ये अभिप्रेत असलेल्या स्वच्छतेच्या कार्यवाहीविषयी अपेक्षा सांगितल्या व त्याच्या पूर्ततेसाठी गतीमान कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
००००००
