मुंबई, ता. २७ : राज्य सरकारने ग्रामीण भागासह शहरी भागातही बाईक टॅक्सी सुरू करण्यास तत्त्वतः मंजुरी दिली आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये बाईक टॅक्सीला परवानगी देऊ नये, अशी भूमिका रिक्षा संघटनांनी घेतली आहे. परिवहनेतर संवर्गातील वाहनांची (दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी) मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी परिवहनेतर संवर्गात नोंदणी केलेल्या वाहनांचे नियमन करण्यासाठी त्यांना एग्रीगेटर म्हणून महाराष्ट्रात सेवा बजावता यावी, यासाठी राज्य सरकारने समिती नेमली होती. त्या समितीच्या अहवालाला सरकारने नुकतीच मंजुरी दिली आहे.
राज्यात ज्या ठिकाणी वाहतुकीच्या अन्य सोयी कमी आहेत किंवा वाहतूककोंडी होते. अशा ठिकाणी बाईक टॅक्सीला परवानगी देण्यात यावी, अशी सूचना समितीच्या अहवालात होती. मात्र राज्य सरकारने ग्रामीण भागासह शहरी भागातही बाईक टॅक्सी चालविण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे शहरी भागातही बाईक टॅक्सीचा मार्ग मोकळा झाला आहे; पण त्यामुळे रिक्षा आणि टॅक्सी वाहतुकीला मोठा फटका बसणार आहे.
