आमदार प्रताप सरनाईक यांची तीर्थ दर्शन योजनेची संकल्पना मान्य
ठाणे : महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे ’मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना“ याच वर्षांपासून लवकरच सुरु होणार असून ६० वर्षा वरील भाविक ज्येष्ठ नागरिकाना त्याचा लाभ घेता येणार आहे. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी केलेली मागणी पाठपुरावा व संकल्पना असलेली मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना लागू कारण्याबाबत लक्षवेधी सूचना आमदार सरनाईक यांनी मांडली होती. त्यावर यावर्षापासून मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना राज्यात तात्काळ लागू केली जाईल अशी घोषणा २९ जून रोजी सभागृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
पहिल्या वर्षी जवळपास १० हजार गरीब गरजू श्रद्धाळू ज्येष्ठ नागरिकाना या योजनेतून त्यांच्या इच्छित तीर्थ क्षेत्रांचे दर्शन सरकारतर्फे घडवले जाईल महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्रात सर्वाधिक महान संत होऊन गेले, ज्यांच्या विचारांचा प्रसार हा भारताच्या सीमा ओलांडून झाला आणि सोबतच एक पावनभूमी म्हणून महाराष्ट्राचे नाव घेतले जाऊ लागले. महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची, भक्ती मार्गाची शेकडो वर्षांची परंपरा आहे. महाराष्ट्र ही संतांची पावनभूमी आहे. येथे भक्ती मार्गाला वाहून घेतलेले लाखो लोक धर्म कार्य, समाज कार्य भक्ती मार्गाने करतात हे सगळ्यांना माहीत आहे. महाराष्ट्र सरकार अनेक भव्य – दिव्य मोठे विकास प्रकल्प राबवत असून महाराष्ट्र राज्य नेहमीच देशाला दिशा दाखवत आला आहे. अशा या संत-वारकरी परंपरा असलेल्या आपल्या राज्यात, महाराष्ट्र राज्य सरकारने मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरु करण्याची मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी फेब्रुवारी महिन्यात मुख्यमंत्र्यांकडे केली होती.
राज्यातील जेष्ठ नागरिक ६० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत (महिलांच्या बाबतीत २ वर्षांची सूट), त्यांना देशातील विविध प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची संधी यामुळे मिळेल. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (IRCTC) कडून यात्रेकरूंना विशेष ट्रेनने प्रवास, नास्ता, भोजन आणि शुद्ध पिण्याचे पाणी, तीर्थक्षेत्रांवर राहण्याची व्यवस्था, आवश्यक असेल तेथे बसने प्रवास, तीर्थ यात्रेत गाईड, एकट्या जेष्ठ नागरिकाला केअर टेकर अशा सुविधा देऊन आपण राज्यातील जेष्ठ नागरिकांना तीर्थयात्रा घडवू शकतो. मुख्यमंत्री तीर्थ यात्रा योजना लागू करण्यासाठी खर्चाची तरतूद, नियमावली, अंमलबजावणी यंत्रणा, ही योजना लागू करण्यासाठी अधिकारी-कर्मचारी यांची नियुक्ती याबाबत मुख्यमंत्र्यांनी तात्काळ आदेश देऊन ही योजना लागू करावी असे आमदार सरनाईक यांनी म्हटले होते. त्यावर आमदार सरनाईक यांनी आज लक्षवेधी सूचना देखील अधिवेशनात मांडली होती. सरनाईक यांची ही मागणी मान्य करत आता राज्य सरकारने ही योजना तात्काळ लागू करत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळ अधिवेशनात जाहीर केले आहे आपल्या हिंदू धर्मात चारधाम यात्रा, माता वैष्णोदेवी यात्रा, अमरनाथ व अन्य प्रसिद्ध यात्रांना खूप महत्व आहे. त्याचबरोबर इतरही मोठी तीर्थस्थळे आहेत जिथे आयुष्यात एकदा तरी जाण्याचे जेष्ठ नागरिकांचे स्वप्न असते. श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या येथे भव्य-दिव्य श्री राम मंदिर उभे राहिले आहे. त्यामुळे अयोध्या राम मंदिर दर्शन करण्याचेही प्रत्येकाचे स्वप्न आहे. हिंदू, ख्रिाश्चन, शीख, बौद्ध, मुस्लिम, जैन धर्मींयांच्या महत्वाच्या तीर्थस्थळांचा आपण या योजनेत समावेश करू शकतो. जेष्ठ नागरिकांचे संघ “समूह तीर्थयात्रा” काढण्याचाही विचार करत असतात. त्यांचे तीर्थयात्रा करण्याचे स्वप्न आपले सरकार साकार करणार आहेत. पैशाअभावी किंवा कोणी सोबत नसल्याने, पुरेशी माहिती नसल्याने अनेक जेष्ठ नागरिक इच्छा असूनही तीर्थ यात्रा करू शकत नाहीत. आता राज्य सरकार ही योजना सुरु करत असल्याने त्याचा फायदा हजारो ज्येष्ठ नागरिकांना होणार आहे असे आमदार सरनाईक यांनी सांगितले.