सुमारे ९२ हजार चौरस फूट क्षेत्रात झाली कारवाई
ठाणे : अनधिकृत पब, हुक्का पार्लर, बार व अंमली पदार्थ विक्री करणारी अवैध बांधकामे निष्कसित करण्याबाबत मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार ठाणे महापालिका क्षेत्रात सलग तिसऱ्या दिवशी कारवाई सुरू होती. महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कारवाईत शनिवारी, शाळा, महाविद्यालयापासून १०० मीटरच्या आत असलेल्या एकूण १९ पानटपऱ्या जप्त तसेच सिल करण्यात आल्या. तर हॉटेल, पब, बार हुक्का पार्लर असे मिळून ११ ठिकाणी पोकलेनच्या सहाय्याने निष्कासन कारवाई करण्यात आली. सुमारे ९२ हजार चुरस फूट क्षेत्रात ही कारवाई झाली आहे.
तरुण पिढी अमली पदार्थाच्या संकटात अडकू नये यासाठी मुख्यमंत्री महोदय यांनी दिलेल्या निर्देशानुसार महापालिका आणि पोलीस विभाग संयुक्तपणे निष्कासन कारवाई करीत आहेत. पोलिसांकडून आलेल्या माहितीनुसार हुक्का पार्लर, बार यावर कारवाई करण्यात आली. या अनधिकृत बांधकामांबाबत महापालिकेच्या कागदपत्रांची तपासणी करून अतिक्रमण विभागाने तोडक कारवाई सुरू केली.
गुरूवारी ठाणे महापालिका क्षेत्रात एकूण ३१ पानटपऱ्या जप्त करुन हॉटेल, पब, बार असे मिळून ०८ ठिकाणी तर ०९ शेडवर कारवाई करण्यात आली होती. तर, शुक्रवारी धुम्रपान निषेध पदार्थ आढळून आले अशी ०८ दुकाने सीलबंद करण्याची कारवाई करण्यात आली. ४० पान टपऱ्या जप्त करण्यात आल्या. तर, ०९ बार, पब, हुक्का पार्लर काढण्यात आले होते. शनिवारी त्यात, १९ पान टपऱ्या आणि ११ हुक्का पार्लर, पब, बार यांची भर पडली.
घोडबंदर रोड, नागला बंदर या भागातील अनधिकृत हुक्का पार्लर, रेस्ट्रो बार वर शनिवारी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने धडक कारवाई केली. त्यात, २१ प्लामस्, पिंक बाबा(सन शाईन) हुक्का पार्लर, फायर प्ले हा बार व हुक्का पार्लर यांच्यावर कारवाई करण्यात आली.
तसेच, वर्तक नगर येथील के नाईट या बारवरही पोकलेनच्या साहाय्याने कारवाई करण्यात आली. त्याचबरोबर, हिरानंदानी इस्टेट येथील रिकीज क्लाउड व माटो माटो या बार समोरील अनधिकृत शेडवर कारवाई करण्यात आली.
नौपाडा-कोपरी प्रभाग समिती अंतर्गत शाळा व महाविद्यालये यांच्या पासून १०० मीटरच्या आतील परिसरात असलेल्या गुटखा व तत्सम पदार्थ विक्री करणाऱ्या ०५ पान टपऱ्या सिल करण्यात आले.
दिवा प्रभाग समितीमधील दिवा-शिळ रोड व शिळ-महापे रोड येथील ०७ पान टपऱ्या जप्त करण्यात आल्या. तसेच ०५ पान टपऱ्या बंद करण्यात आल्या. वागळे प्रभाग समितीअंतर्गत शाळेजवळ एक पान टपरी सीलबंद करण्यात आली. तसेच, एक पान टपरी जप्त करण्यात आली.
प्रभाग समितीनिहाय करण्यात आलेली कारवाई अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभागाचे उपायुक्त जी. जी. गोदेपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ एकचे उपायुक्त मनिष जोशी, परिमंडळ दोनचे उपायुक्त शंकर पाटोळे, परिमंडळ तीनचे उपायुक्त दिनेश तायडे, सहायक आयुक्त महेश आहेर, अक्षय गुडदे, प्रीतम पाटील, सोपान भाईक, लक्ष्मण गरुडकर यांच्या उपस्थिती पोलीस बंदोस्तात कारवाई करण्यात आली.