मुंबई : कित्ते भंडारी ऐक्यवर्धक मंडळी या संस्थेचे संस्थापक भंडारी समाजाचे मानबिंदू रावबहाद्दूर सी. के. बोले यांच्या १५५ व्या जयंतीदिनी संस्थेच्या सेवकांना त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचा बहुमान मिळाला. त्यामुळे त्या सेवकांना त्यांनी केलेल्या सेवेचे चीज झाल्याचे समाधान मिळाले.
भंडारी समाजाची शैक्षणिक प्रगती व्हावी, भंडारी समाजातील युवकांना शैक्षणिक, सामाजिक प्रगतीत साह्य व्हावे यासाठी लोकहितवादी रावबहादूर सी. के. बोले यांनी कित्ते भंडारी ऐक्यवर्धक मंडळी या संस्थेची स्थापना १८९० मध्ये स्थापना केली.
रावबहाद्दूर सी. के. बोले यांचा जन्म २९ जून १८६९ रोजी पालशेत येथे त्यांच्या आजोळी झाला. गुहागर तालुक्यातील आरे हे त्यांचे मूळ गाव. त्यांची जयंती भंडारी समाजाच्या संस्थांत सर्वत्र साजरी होते. रावबहाद्दूर सी. के. बोले यांच्या १५५ व्या जयंतीदिनी दादरच्या कित्ते भंडारी हॉलमध्ये त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी हा बहुमान या संस्थेचे सेवक श्री. प्रवीण गावडे आणि नितेश गावडे याना मिळाला.
पदाधिकाऱ्यांमुळे संस्थेचा कारभार चालतो, हे खरे असले तरी खऱ्या अर्थाने संस्थेचा कारभार तेथील कर्मचाऱ्यांमुळे सुस्थितीत असतो. प्रवीण गावडे, नितेश गावडे आणि स्वप्नील साटल्ये हे अनेक वर्षे संस्थेत प्रामाणिक सेवा बजावत आहेत. म्हणूनच त्यांना रावबहादूर सी. के. बोले याना पुष्पमाला अर्पण करण्याचा बहुमान मिळाला.