नवी मुंबई : ‘स्वच्छ सर्वेक्षण 2024’ अंतर्गत ‘सफाई अपनाओ, बिमारी भगाओ’ हे विशेष अभियान स्वच्छ भारत मिशनच्या वतीने जाहीर करण्यात आले असून त्या अंतर्गत आज 29 जून रोजी नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दिवाळेगाव येथे खाडीकिनारी विशेष स्वच्छता मोहीम स्थानिक नागरिकांच्या सहभागातून यशस्वीपणे राबविण्यात आली.
नुकताच आयुक्त महोदयांनी केलेल्या मार्केट्सच्या पाहणी दौ-याप्रसंगी दिवाळे मार्केटच्या भेटीप्रसंगी त्याठिकाणी लोकसहभागातून स्वच्छता मोहीम हाती घेण्याबाबत सूचित केले होते. त्यास अनुसरून आज अतिरिक्त आयुक्त श्री. सुनील पवार यांच्या नियंत्रणाखाली व प्रत्यक्ष सहभागातून विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. स्वच्छतेचा व आरोग्याचा परस्पर संबंध लक्षात घेत स्वच्छतेचे पालन करा आणि आरोग्याचे रक्षण करा असा संदेश यावेळी प्रसारित करण्यात आला.
परिमंडळ 1 चे उपआयुक्त श्री. सोमनाथ पोटरे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ.अजय गडदे यांच्यासह बेलापूर विभागाचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी श्री.शशिकांत तांडेल यांच्या सक्रिय सहभागातून संपन्न झालेल्या या मोहीमेत दिवाळे गावांतील स्थानिक मच्छीमार, मासळी विक्रेत्या महिला उत्साहाने सहभागी झाल्या होत्या. त्यांच्या समवेत ज्येष्ठ नागरिकही मोठ्या संख्येने सहभागी होते. त्यासोबतच एस.के.कॉलेज नेरूळ आणि विद्या प्रसारक कॉलेज येथील एनएसएस विद्यार्थीही या मोहीमेत उत्साहाने सहभागी होते.
यावेळी उपस्थितांनी सामुहिकरित्या माझी वसुंधरा अभियान तसेच स्वच्छता व प्लास्टिक बंदीची शपथ ग्रहण केली. स्वच्छ सर्वेक्षण 2024 बाबत यावेळी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शनही करण्यात आले या मोहीमेत प्लास्टिक, थर्माकोल व तत्सम इतर वस्तूंचा 51 गोणी कचरा जमा करण्यात आला.
०००००