मुंबई : लोकसभा निवडणुकीत भाजपचा राज्यात मोठा पराभव झाल्याने आणि त्याचे खापर महायुतीतील नेते एकमेकांवर फोडत असताना सहकारी पक्षांबरोबर राहूनच विधानसभा निवडणूक लढवायची आणि बहुमत मिळवायचे, अशी रणनीती भाजपने निश्चित केली आहे.
राज्याचा अर्थसंकल्प सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवून मांडला आहे. त्यामुळे योजना जनतेपर्यंत पोचविण्यासाठी सहकारी पक्षांच्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन १० जुलैपर्यंत अभियान राबविण्याचा निर्णय भाजपच्या केंद्रीय नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या विस्तारित सुकाणू समितीच्या बैठकीत शनिवारी घेण्यात आला.
विधानसभा निवडणुकीत जागावाटपावरून वाद होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या केंद्रीय नेत्यांच्या उपस्थितीत प्रदेश भाजपच्या विस्तारित सुकाणू समितीची बैठक प्रदेश कार्यालयात झाली. लोकसभा निवडणुकीत झालेल्या चुका व त्रुटी दूर करून विधानसभा निवडणुकीची तयारी कशी करायची, याविषयी बैठकीत चर्चा झाली.
सहकारी पक्षांबरोबर विधानसभा निवडणूक लढवायची आणि बहुमत मिळवायचे, अशी रणनीती भाजपने निश्चित केली असून त्या अनुषंगाने विस्तृत चर्चा झाली. भाजपला सर्वसामान्य जनतेचा आशीर्वाद असल्याने विधानसभेत बहुमत मिळेलच. असे शेलार यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले.
अमित शहांच्या उपस्थितीत बैठक
भाजपच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांची १३ जुलै रोजी तर विस्तारित कार्यसमितीची १४ जुलै रोजी पुण्यात बैठक होणार आहे. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहण्याची शक्यता आहे. विस्तारित कार्यसमितीच्या बैठकीसाठी राज्यभरातील सुमारे चार हजार पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *