श्वास घेणेही झाले होते कठीण, मित्रही आला धावून; दाखविले माणुसकीचे दर्शन
नितिन दूधसागर
ठाणे : भारतीय वंशाचा 49 वर्षीय ऑस्टेलियन नागरिक ठाण्यात सासूला भेटण्यासाठी भारतात आला. मात्र निमित्त झाले खोकल्याचे आणि अचानक त्यांची प्रकृती खालावून श्वासही घेणे कठीण झाले. संसर्गजन्य आजाराने त्रस्त झालेल्या या रुग्णाला तातडीने नौपाडा येथील होरायझन हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले. होरायझन हॉस्पिटलच्या डॉक्टरांच्या टीमने अत्याधुनिक उपकरणांच्या सहाय्याने उपचार करुन शर्थीच्या प्रयत्नांनी जीवदान दिले आहे.
ऑस्ट्रेलियन नागरिक हे 16 फेब्रुवारी 2024 रोजी बाळकुम, ठाणे येथे राहणाऱया त्यांच्या सासूला भेटण्यासाठी भारत भेटीवर आले. भारतात आल्यानंतर 2-3 दिवसांनी त्यांना खोकला आणि अशक्तपणाचा त्रास होऊ लागला. छातीत किरकोळ जळजळ आणि संसर्ग आहे असे समजून त्यांनी जवळच्या डॉक्टरांकडून खोकला आणि अशक्तपणावर उपचार सुरू केले. उपचारांना प्रतिसाद मिळत नव्हता. त्यांनतर खोकल्यावर थोडीशी रक्ताची थुंकी दिसल्यानंतर ते अधिक चिंतेत पडले.
हळूहळू त्यांना अधिक अशक्तपणा आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. ऑस्ट्रेलियात असलेल्या आपल्या पत्नीला व्हिडिओ कॉलवर त्यांनी आपली चिंता व्यक्त केली. तिने ताबडतोब भारतातील आपल्या डॉक्टर मित्राशी बोलणे पेले. त्यांना 28 फेब्रुवारी 2024 रोजी ठाण्यातील नौपाडा येथील होरायझन हॉस्पिटलचे पल्मोनोलॉजिस्ट, इन्टेन्सिव्हिस्ट आणि वैद्यकीय संचालक यांच्या ओळखीच्या एका फिजिशियनमार्फत होरायझन रुग्णालयात आणले.
रुग्णालयात दाखल होताच त्यांना ताप आणि श्वसनाचा त्रास होत होता. खोलीच्या हवेत ऑक्सिजन सॅच्युरेशन 65 टक्के पर्यंत ऑक्सिजन सॅच्युरेशनसह ऊर्जेची कमतरता होती. त्यांना तातडीने एनआयव्हीसपोर्ट देण्यात आला. सखोल तपासणीनंतर अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. दुसऱयाच दिवशी म्हणजे 29 फेब्रुवारी 2024 रोजी रुग्ण उपचारांना प्रतिसाद देत नसल्याचे व श्वसनदर व ऑक्सिजन सॅच्युरेशन मोठ्या प्रमाणात कमी होत असल्याचे निदर्शनास आले. त्यांना तातडीने व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. व्हेंटिलेटरचा आधार असूनही त्यांच्या ऑक्सिजन सॅच्युरेशन आणि श्वसनात सुधारणा झाली नाही; हे प्राथमिक फुफ्फुस निकामी होण्याचे सूचक होते. जीवरक्षक उपाय म्हणून ईसीएमओ प्रक्रियेची आवश्यकता असल्याचे तज्ञांचे मत घेण्यात आले आणि कुटुंबीयांना माहिती देण्यात आली आणि समुपदेशन करण्यात आले.
आवश्यक प्रक्रिया आणि वैद्यकीय व्यवस्थापनासह ईसीएमओ थेरपी 29 फेब्रुवारी 2024 रोजी सुरू करण्यात आली. त्यानंतर संपूर्ण टीमसाठी तिथला प्रवास खडतर होता. संपूर्ण आयसीयू परिचारिकांच्या कठोर आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांनी डॉक्टर हृषीकेश वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर, परफ्युजनिस्ट, ईसीएमओ थेरपी या महत्त्वाच्या निकषांचे दैनंदिन निरीक्षण तसेच पल्मोनोलॉजिस्ट, हृदयरोगतज्ञ, ईएनटी सर्जन, नेफ्रोलॉजिस्ट यांचा संपूर्ण प्रवासात सहभाग होता.
रूग्णामध्ये सुधारणा दिसू लागल्यावर 7 मार्च 2024 रोजी ईसीएमओ थांबविण्यात आला. धमनी लाइन काढून टाकण्यात आली. टीटी ट्यूब काढून टाकण्यात आली. रुग्णाने संपूर्ण थेरपीला चांगला प्रतिसाद दिला आणि 11 मार्च 2024 पर्यंत आपली स्थिती पूर्णपणे परत मिळवली.
या सर्व प्रक्रियेत रुग्णाचा मित्र वेळेत धावून आला आणि आपल्या माणुसकीचे दर्शन दिले. तर अत्याधुनिक सामुग्री आणि योग्य उपचार तसेच देवाच्या कृपेने आज रुग्ण ऑस्ट्रेलीयाला जाण्यास सज्ज असल्याचे डॉक्टर हृषीकेश वैद्य यांनी सांगितले.
