मुंबई : अंधेरी पश्चिम येथील बारमध्ये हुक्का तपासणीसाठी गेलेल्या पोलीस शिपायाला धक्काबुक्की करून मारहाण केल्याप्रकरणी अंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी बार व्यवस्थापकाला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याविरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार पोलीस शिपाई समाधान पाटील अंबोली पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. त्यांना हुक्का तपासणी करण्यापासून रोखणाऱ्या व मारहाण करणारा व्यवस्थापक जॉएन नॉरबट फर्नांडीस (३४) याला अंबोली पोलिसांनी अटक केली आहे. तक्रारीनुसार शनिवारी मध्यरात्री तक्रारदार पोलीस परिसरातील बार, हुक्का पार्लर व पब यांची तपासणी करीत होते. त्यावेळी वीरा देसाई मार्गावरील लिटील डोअर हॉटेल ॲण्ड बार येथे हुक्का तपासणीसाठी पाटील गेले असता आरोपी व्यवस्थापक फर्नांडीस याने त्यांना अडवले. त्यांना धक्काबुक्की केली व त्यांच्या गालावर चापट मारली. याप्रकरणानंतर इतर पोलिसांच्या मदतीने फर्नांडिसला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले. त्यानंतर पोलीस ठाण्यात आणून त्याला अटक करण्यात आली.
0000