नवी दिल्ली : अजित पवारांच्या राष्ट्रवादीला लक्षद्वीपमध्ये घड्याळ चिन्ह मिळणार नाही. अजित पवार गटाने उशिरा अर्ज सादर केल्याने पहिल्या टप्प्यात घड्याळ चिन्ह वापरता येणार नाही, असं निवडणूक आयोगाने सांगितले आहे. लोकसभा निवडणुकीसाठी लक्षद्वीपमध्ये पाहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे.
महाराष्ट्र आणि नागालँडमध्ये घड्याळ चिन्ह राष्ट्रवादी काँग्रेस आहे. त्यामुळे तिथल्या निवडणुकीत घड्याळ अजित पवार यांना मिळणारच आहे. तसेच 2024 सार्वत्रिक निवडणुकांत अजित पवार यांच्या प्रत्येक उमेदवाराला घड्याळावर लढता यावे, यासाठी त्यांनी अर्ज केला होता. चिन्ह आदेश परिच्छेद 10 नुसार निवडणुकांची अधिसूचना निघाल्यानंतर जास्तीत जास्त तिसऱ्या दिवशी कॉमन चिन्हाचा अर्ज ग्राह्य धरला जातो. अजित पवार गटाने 24 मार्च रोजी अर्ज केला आणि पहिल्या टप्प्यातील निवडणुकीची अधिसूचना 20 मार्च रोजी निघाली. एक दिवस उशीर झाल्याने आता पहिल्या टप्प्यात अजित पवारांना घड्याळ मिळणार नाही. लक्षद्वीप पहिल्या टप्प्यात निवडणुका होत असल्याने तिथे घड्याळ चिन्ह मिळणार नाही.
निवडणूक आयोगाने अजित पवारांना दिलय घड्याळ चिन्ह
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जुलै 2023 मध्ये फूट पडली. त्यानंतर निवडणूक आयोगाने बहुमताच्या जोरावर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला घड्याळ हे चिन्ह दिले. तर शरद पवार यांच्या गटाला तुतारी हे चिन्ह मिळाले होते. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आता अजित पवारांना निवडणूक आयोगाने मोठा धक्का दिलाय. वेळेत अर्ज दाखल केला नसल्याने अजित पवारांना घड्याळ चिन्हाच्या वापरावर मर्यादा येणार आहे.
महाराष्ट्रात घड्याळ चिन्हावरच लढणार
अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला लक्षद्वीपमध्ये घड्याळ चिन्ह वापरता येणार नाही. मात्र, महाराष्ट्रात होणाऱ्या आगामी लोकसभा निवडणुकांसाठी अजित पवार घड्याळ हे चिन्ह वापरु शकतात. महाराष्ट्रात अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस 4-6 जागा लढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रात अजित पवारांना एकप्रकारे दिलासाच मिळालाय. महायुतीच्या जागा वाटपात अजित पवारांना 5 ते 6 जागांना मिळण्याची शक्यता आहे. मावळ, शिरुर, बारामती, रायगड आणि परभणी या 5 जागांचा समावेश असल्याचे बोलले जात होते.