कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आज आठ उमेदवारांची पहीली यादी जाहीर केली. शिंदे यांना साथ दिलेल्या तेरापैकी 12 खासदारांना पुन्हा एकदा संधी दिली जाणार आहे. आज वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये चर्चा झाली. त्यानंतर आठ उमेदवार जाहीर केले गेले.

शिवसेनेने जाहीर केलेल्या यादीत कोल्हापूरमधून संजय मंडलिक, हातकणंगल्यातून धैर्यशील माने,  मुंबई दक्षिण मध्यमधून राहुल शेवाळे, मावळमधून श्रीरंग बारणे, रामटेकमधून राजू पारवे, हिंगोलीतून हेमंत पाटील, बुलडाणातून प्रतापराव जाधव आणि शिर्डीतून सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. ठाणे आणि नाशिकमधील उमेदवार अद्याप घोषित करण्यात आलेला नाही. दरम्यान, या यादीत रामटेकचे विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांच्याऐवजी राजू पारवे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

  • मुंबई दक्षिण मध्य – राहुल शेवाळे
  • कोल्हापूर – संजय मंडलिक
  • शिर्डी – सदाशिव लोखंडे
  • बुलढाणा – प्रतापराव जाधव
  • हिंगोली – हेमंत पाटील
  • मावळ – श्रीरंग बारणे
  • रामटेक – राजू पारवे
  • हातकणंगले – धैर्यशील माने

ठाणे, कल्याण, नाशिक, वाशिम वेटिंगवर

शिवसेनेने कल्याण, नाशिक आणि ठाण्याची उमेदवारी मात्र आज जाहीर केलेली नाही. नाशिकच्या हेमंत गोडसेंच्या नावाला भाजपचा विरोध आहे, त्याचवेळी राष्ट्रवादीने त्या जागेवर दावा केला आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंच्या घरच्या ठाण्याच्या जागेवरच भाजपने दावा केला आहे. ही जागा आपल्यालाच मिळावी म्हणून भाजप आग्रही आहे. तर ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याने शिंदेही ती जागा सोडण्यास तयार नाहीत.

कल्याणमधून एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे हेच उमेदवार असतील हे नक्की असलं तरी त्यांचं नाव पहिल्या यादीत नाही. तर दुसरीकडे यवतमाळ वाशिमच्या जागेवरून तिढा निर्माण झाला आहे. वाशिमच्या पाच वेळच्या खासदार असलेल्या भावना गवळी यांच्या नावाला भाजपचा विरोध असल्याची माहिती आहे. तर संजय राठोड यांना उमेदवारी द्यावी असा भाजपचा आग्रह आहे. यावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *