शुक्रवार, 4 जुलै 1975..
वेळ संध्याकाळची सव्वासहाची..
आज गुरूवार, 4 जुलै 2024..
तीच तारीख, वार फक्त एक दिवस आधीचा..
माझ्या जीवनातील आणीबाणी पर्व सुरू झाले ते याच दिवशी..
आज बरोबर 49 वर्षे पूर्ण होताहेत..
मी स्टेट बँकेतील काम संपवून चर्चगेट गाठून माटुंग्याला विद्यार्थी परिषदेच्या कार्यालयात जायला निघालो होतो..
चर्चगेट स्टेशनसमोरील कामदार शो रूमजवळ आलो आणि माझ्या लक्षात आलं स्टेशनबाहेरची गर्दी काही वेगळ्याच प्रकारची जमली आहे..
रस्ता ओलांडण्यासाठीचा पूल पार करून मी चर्चगेट स्थानकाच्या दिशेने उतरलो आणि पोलीस खात्यातील गुप्त वार्ता विभागाची ( एलआयबी ) ची माणसं दिसायला लागली..
मी झटकन दिशा बदलून सत्कार हाॅटेलच्या दिशेला वळलो आणि त्या गेटनं स्टेशनात प्रवेश केला..
चुकवलं एलआयबी वाल्यांना, या समाधानात मी होतो आणि एलआयबी वाले मात्र माझी प्रत्येक हालचाल टिपत होते..
मी स्टेशनात येऊन बोरिवली लोकल पकडली आणि तितक्यात दोघे एलआयबी वाले डब्यात शिरले आणि साहेबांनी बाहेर बोलावलंय असा निरोप त्यांनी दिला…
माझं अटकपर्व सुरू झालंय याची कल्पना आली..
मी गाडीतून उतरून स्टेशनबाहेर पोलीस बंदोबस्तात आलो तर सत्याग्रह सुरू झाला होता..
मला पोलीस अधिकाऱ्यानं अटकेची कल्पना दिलीच होती..
काहीही न करता कशाला आत जायचं असं मनाशी ठरवून चार घोषणा मीही दिल्या आणि पोलीस व्हॅनमध्ये जाऊन बसलो..
माझ्या जोडीला हळूहळू येऊन बसले सर्वोदयी कार्यकर्ते गरोडिया, जगन्नाथ जाधव, राम तांबे, फरोख खान आणि एक जण.. ( मृणाल गोरे यांचा सहकारी, नाव विसरलो )
आमची वरात आर्थर रोड जेलला जाऊन स्थिरावली तेव्हा धुवाधार पाऊस कोसळत होता आणि मध्यरात्र झाली होती..
आज माझ्याबरोबरचे ते पाचही साथीदार हयात नाहीत..
स्टेट बँकेत कम्युनिस्ट युनियन होती, तिने व्यवस्थापनाचे कान फुंकले, माझेवर कारवाई सुरू होणार, हे पाहताच माझी बाजू मांडली ती माझे तत्कालीन बॉस प्लॅनिंग मॅनेजर एम एम रेगे यांनी..
पुढे मी कारवाईविरोधात लढलो, त्याची सगळी कागदपत्रं ज्येष्ठ फौजदारी वकील बाबाराव भिडे यांनी तयार केली..
केस जिंकलो, पूर्ण पगारासकट बँकेत रूजू झालो, पण तोपर्यंत रेगे साहेब अनंताच्या प्रवासाला गेले होते.. आज आता बाबारावही नाहीत, त्यांची आठवण आज येणं स्वाभाविक आहे..
मला पत्रकारिता करायची आहे हे कळल्यावर बँकेनं मला पुण्याला बदली दिली..
सकाळी दोन तास बँक करून उरलेला वेळ मी तरूण भारतसाठी देत होतो..
पत्रकारितेचं हे वेड डोक्यात भरवलं ते डाॅ. श्रीपती शास्त्री यांनी, आणि एका पैशाचंही आर्थिक नुकसान होणार नाही, असं माझ्या वेतनाचं आर्थिक गणित बसवलं बाबूराव काणे यांनी..
शास्त्रींनी प्रेमाग्रहानं लिहिलेलं एक पत्र माझ्या संग्रही आजही आहे..
आज या पन्नासाव्या वर्षात ते दोघंही हयात नाहीत.. मी मुंबई तरूण भारत सुरू करण्याच्या हेतूनं पुण्याहून मुंबईत आलो, तेव्हाचे माझे पुण्यातील वरिष्ठ सहकारी बापूसाहेब भिशिकर, वसंतराव गीत, मनोहरराव कुंटे, भावे, वसंत उपाध्ये, विसुभाऊ देवधर, चित्तरंजन पंडित, आणि पहिले दोन सहकारी विद्याधर अभ्यंकर, नरेंद्र पाठक यातले कुणीच हयात नाहीत. त्या सर्वांची आठवण येणं अपरिहार्य आहे..
अटक झाली तेव्हा मी विद्यार्थी परिषदेचा केंद्रीय पदाधिकारी होतो..
माझी बहुतांश सामाजिक जडणघडण झाली ती विद्यार्थी परिषदेत.. ती घडवण्यात मोठा वाटा होता तो प्रा. यशवंतराव केळकर, बाळ आपटे, सुरेशराव मोडक, गणेश जोशी यांचा..
प्रतिकूल तेच घडेल हे गृहीत धरून नेहमी चालावं हे बजावणारी ही वरिष्ठ सहकारी मंडळी आज हयात नाहीत, याचं दु:ख आहे..
पत्रकारितेत मी आलो ते माझ्या मावशीचे यजमान पत्रपंडित राजाभाऊ शिधये यांच्याकडे पाहून..
मी लिहावं, अनुवाद करावेत असं सुचवून माझ्याकडून पाच सहा पुस्तकांचे अनुवाद करवून घेतले ते तेव्हाच्या भारतीय विचार साधनेच्या विनायकराव जोशी यांनी..
आज हे दोघेही हयात नाहीत..
मी अटक झाली तेव्हा मुंबईत राहत होतो, मामा सावरकर आणि उषाताई सावरकर हे माझे पालक होते.. माझं डोंबिवलीचं घर तेव्हा भूमिगत चळवळीचं एक केंद्र होतं..
माझा धाकटा भाऊ आर्किटेक्चरची परिक्षा उत्तीर्ण होऊन संघ प्रचारक म्हणून बाहेर पडला होता, तर वडील सरकारी नोकरीत होते..
घरी वारंवार झडत्या होत, काहीच सापडतही नसे आणि आपल्या नोकरीवर गदा येईल अशी भीतीही त्यांना वाटत नसे..आई तर समितीचं काम करायची, माझा मामा संघ प्रचारक या नात्यानं भारतीय मजदूर संघाचं काम पहात होता.. त्यामुळे तिनेही कधी झडत्या-बिडत्यांना भीक घातली नाही..
आज आता आई-वडील-मामा, सावरकर पतीपत्नी कुणीच हयात नाहीत..
आणि भाऊही प्रचारकपदाच्पा पन्नासाव्या वर्षात आहे.. यथावकाश मी तरूण भारत सोडून लोकसत्तात रुजू झालो. संपादक पदावरून खालच्या पदावर जाताना काय वाटलं असा प्रश्न अनेकांनी केला..
नशिबात असेल, कपाळावर लिहिलेलं असेल, तर मी लोकसत्तेतही संपादक होईन असं उत्तर मी दिलं खरं, पण ते कशाच्या भरवशावर हे माझं मलाच माहीत नव्हतं..
तरुण भारतात संपादक म्हणून मिळणारा पगार आणि लोकसत्तात को-ऑर्डिनेटर म्हणून मिळणारा पगार यात तफावत होती..
मी लोकसत्तात यावं यासाठी गोएंका यांच्याकडे शब्द टाकला होता नानाजी देशमुखांनी..
त्या एका शब्दावर टिकेकर नाराज झाले होते, मला आधी का नाही सांगितलंस अशी विचारणा त्यांनी केली होती. पण ती नाराजी कधीही दुराव्यात परावर्तित झाली नाही..
लोकसत्ताचा पगार कमी होता, पण व्यवस्थापनाशी बोलून किमान तेवढा पगार द्या असा आग्रह नानाजी देशमुखांनी व्यवस्थापनाकडे मांडला आणि मी नवा पैसा जास्त न घेता लोकसत्तात रुजू झालो..
पुढे यथावकाश निवासी संपादकपद रिकामं होताच कुमार केतकरांनी आणि अशोक प्रधानांनी अन्य सर्व दडपणं झुगारून मला निवासी संपादक केलं आणि लोकसत्तात भूकंप झाला..
आज नानाजीही नाहीत, टिकेकर नाहीत आणि अशोक प्रधानही नुकतेच निवर्तले, तेही हयात नाहीत..तरूण भारत आणि लोकसत्ताची पत्रकारिता सुरू असतानाच डोंबिवलीच्या सार्वजनिक जीवनात थोडाफार सक्रीय झालो होतो..
स्वरतीर्थ सुधीर फडके स्मृती समितीचा वीस वर्षे अध्यक्ष होतो, अनेक सांगीतिक उपक्रम राबवले, भारत विकास परिषद या लायन्स-रोटरीच्या धर्तीवरील संस्थेची डोंबिवली शाखा सुरू करण्याचं भाग्य लाभलं.. नववर्ष स्वागतयात्रा सुरू केली, सर्व वैद्यकशाखातील नववैद्यकांच्या एकाच समारंभातील स्वागताची अनोखी परंपरा सुरू केली, ज्यांनी डोंबिवली घडवली अशा 100 व्यक्तींवर लिहिता आलं, 45 हून अधिक संस्थांचा मिळून नागरी अभिवादन न्यास स्थापन करून काही उपक्रम राबवता आले, जन गणची शताब्दी अकरा संस्था एकत्र करून साजरी करतात आली, असं बरंच काही..पण या साऱ्या वाटचालीत महत्वाची साथ मिळालेले मधुकरराव चक्रदेव, सुरेंद्र बाजपेई, श्रीपाद पटवारी, विनायक जोशी असे अनेक सहकारी आज हयात नाहीत.. आज हे सारं आठवतंय आणि मी या अशा अनेक मंडळींना मिस करतो आहे, तो या 4 जुलैच्या योगावर..
-सुधीर जोगळेकर
