ठाणे : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे लोकसभेचे उमेदवार खासदार राजन विचारे यांनी शिवजयंती निमित्ताने गुरुवारपासून प्रचाराला शुभारंभ केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून राजन विचारे यांनी प्रचाराला प्रारंभ केला. महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून धुसफूस सुरू असताना दुसरीकडे ठाण्यात राजन विचारे यांचा प्रचार करण्यासाठी महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. विचारे यांनी शिवाजी महाराजांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण केल्यानंतर त्यांनी कोर्टनाका येथील . बाबासाहेब आंबेडकर, शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या स्मारकाला अभिवादन केले. त्यानंतर सर्व पदाधिकाऱ्यांनी आनंद दिघे यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले. निष्ठावंत आणि गद्दारांमधील ही लढाई आहे असे राजन विचारे म्हणाले.
संपूर्ण राज्याचे लक्ष असलेल्या महत्त्वाच्या लोकसभा मतदारसंघापैकी एक असलेला ठाणे लोकसभा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. शिवसेनेत फूट पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत ठाणे जिल्ह्यातील बहुतांश पदाधिकारी, आमदार, माजी लोकप्रतिनिधी गेले आहेत. तर खासदार राजन विचारे हे अद्यापही उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. उद्धव ठाकरे यांनी त्यांना उमेदवारी जाहीर करताच, त्यांनी शिवजयंती निमित्ताने प्रचाराला सुरूवात केली. तलावपाली येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला त्यांनी पुष्पहार अर्पण केला. यावेळी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), काँग्रेस तसेच महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यानंतर विचारे यांनी कोर्टनाका येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आणि शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या स्मारकाला अभिवादन केले. खारकरआळी भागातील एका मैदानात आनंद दिघे यांचे स्मृतीस्थळ आहे. स्मृतीस्थळावर जाऊन त्यांनी स्मृतीस्थळाचे दर्शन केले. महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी राजन विचारे यांच्यासोबत उपस्थित होते.
सध्या लोकशाही संपविण्याचे काम सुरू आहे. सर्वसामान्य आणि सूज्ञ नागरिक मतदानाची वाट बघत आहेत. नागरिक त्यांना नक्की धडा शिकवतील. निष्ठावंत आणि गद्दारांमधील ही लढाई आहे. ठाण्यातून गद्दारांना गाडण्याचे काम इंडिया आघाडीचे कार्यकर्ते करत आहेत.
– राजन विचारे, खासदार.