उमेदवार निश्चितीपूर्वीच महाविकास आघाडीत दुही

बदलापूर: लोकसभा निवडणुकीत ठाणे जिल्ह्यात भिवंडी लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या कपिल पाटील यांना लढत देण्यासाठी अद्याप महाविकास आघाडीकडून उमेदवार निश्चित होत नसतानाच आता काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला ही जागा दिल्यास सामूहिक राजीनामे देण्याचा इशारा दिला आहे. ही दूही भाजपच्या पथ्यावर पडण्याची शक्यता व्यक्त होते आहे.

भिवंडी लोकसभा मतदारसंघातून भाजपचे कपिल पाटील सलग दोनदा निवडून आलेले आहेत. त्यांच्या रूपाने पहिल्यांदाच आगरी समाजाला केंद्रीय मंत्रीपद मिळाले होते. आता भाजपतर्फे कपिल पाटील यांना तिसऱ्यांदा लोकसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. उमेदवारी मिळताच कपिल पाटील यांनी महायुतीच्या घटक पक्षांशी चर्चा आणि भेटीगाठी सुरू केल्या. कपिल पाटील यांना भाजप आणि शिवसेनेतून विरोध करणारा एक गट आहे.

पाटील यांच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवून पक्षातील आणि विशेषत: शिवसेनेत अनेक जण त्यांना विरोध करतात. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेतील विरोधी गटाने पाटील यांचा प्रचार करण्यास नकार दिला होता. खुद्द एकनाथ शिंदे यांना यासाठी प्रचारात उतरावे लागले होते. यंदाही ही नाराजी कायम आहे. मात्र पाटील यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. दुसरीकडे पाटील यांच्या विरोधात उमेदवार निश्चित करण्यात महाविकास आघाडीला यश येताना दिसत नाही.

भिवंडी हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ आहे. मात्र गेल्या काही निवडणुकीत इथे काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या जागेची मागणी केली जाते आहे. मात्र ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यास आता काँग्रेसने विरोध केला आहे. कोकण विभागात ही एकमेव जागा आता काँग्रेसच्या ताब्यात राहिली आहे. त्यामुळे ही जागा काँग्रेसलाच द्यावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करणार नाही. तसेच काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी सामूहिक राजीनामे देतील, असा इशारा बदलापूर ब्लॉक काँग्रेसच्या वतीने देण्यात आला आहे. काँग्रेसचे संजय जाधव यांनी याबाबत माहिती दिली. त्यामुळे उमेदवार निश्चित होण्याआधीच महाविकास आघाडीत मतभेद होत असल्याचे चित्र आहे. या मतभेदाचा फायदा भाजपच्या कपिल पाटील यांना होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

०००००

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *