अमरावती : अमरावतीतून नवणीत राणांना स्वकीयांचा विरोध डावलून भारतीय जनता पार्टीने दिलेली लोकसभेती उमेदवारी चांगलिच वादात सापडली आहे. भाजपाच्या स्थानिक कार्यकर्त्यांसह महायुतीचा घटक पक्ष असलेल्या प्रहारकडूनच विरोध करण्यात आला. याचाच पुढचा टप्पा म्हणून प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी नवनीत राणांविरोधात बंडाचे निशाण फडकावत थेट प्रहार केलाय. त्यांच्या प्रहार पक्षातर्फे बच्चू कडू यांनी ठाकरे गटाचे नेते दिनेश बूब यांना लोकसभेची उमेदवारी दिली आहे.
अमरावतीत झालेल्या पत्रकार परिषदेत दिनेश बूब यांनी प्रहार पक्षात प्रवेश केला. तसेच त्यांना लोकसभेची उमेदवारीही देण्यात आली. “यंदाच्या निवडणुकीत कोणाला जिंकून द्यायचे याच्याही आधी कोणाचा पराभव करायचा, हे अमरावतीतल्या जनेतेने आधीच ठरवले आहे. मात्र, खासदार कोणाला करायचे यासाठी अमरावतीत सक्षम उमेदवार नसल्याने प्रहार पक्षाने मला उमेदवारी दिली आहे”, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.
“जर जनतेने मला निवडून दिले, तर चुकीच्या माणसाला निवडून दिल्याचा पश्चाताप त्यांना होणार नाही. अमरावतीकरांना अभिमान वाटेल, असे काम मी करेन. जिल्ह्याच्या हितासाठी आणि भावी पिढीसाठी आदर्श लोकप्रतिनिधी निर्माण व्हावा, यासाठीच मला उमदेवारी देण्यात आली आहे”, असेही ते म्हणाले.
दरम्यान, काँग्रेसकडून दर्यापूरचे आमदार बळवंत वानखडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याशिवाय वंचित आघाडीने प्राजक्ता पिल्लेवान यांना उमेदवारी घोषित केली आहे. महत्त्वाचे म्हणजे अमरावतीत काँग्रेस भाजपा आणि प्रहार यांच्यात तिरंगी लढत होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहे.
नितेश राणेंची रक्त तपासणी करा- बच्चू कडू
मुंबई : आमदार बच्चू कडू यांचं वादळ सागर बंगल्यावर शमलय, असं भाजप नेते नितेश राणे म्हणाले होते. राणेंच्या टीकेला बच्चू कडू यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलय. “खरतर नितेश राणेंची रक्त तपासणी केली पाहिजे. आम्ही शमणारे नाहीत. आम्ही सागरातील लाटा आहोत. ते राणेला माहिती नसेल. त्यामुळे राणेने याबाबत वाच्यता करु नये. मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करु नये. आम्ही अमरावती पुरत लढत आहोत आणि मैत्रीपूर्ण लढत आहोत. तुम्हाला वाटत असेल आम्हाला छेडावं तर आमची काही हरकत नाही. सध्या महायुतीतून बाहेर पडण्याचा आमचा इरादा नाही”, असं प्रत्युत्तर आमदार बच्चू कडू यांनी दिलय.