अनिल ठाणेकर

 

 

ठाणे : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झालेले असून, यामुळे प्रचंड दुर्गंधी पसरुन, रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्हाधिकारी कार्यालयाव्यतिरिक्त, याच परिसरात असणाऱ्या शिधावाटप कार्यालयाच्या दारातच कचऱ्याचे ढिगारे साचलेले असून, याचा अभ्यांगतांना मोठ्याप्रमाणात त्रास होत आहे, अशी तक्रार धर्मराज्य पक्षाचे सहसचिव नरेंद्र पंडित यांनी, ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्याकडे एका लेखी पत्राद्वारे केली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील या कचऱ्यातून निर्माण झालेल्या दुर्गंधीमुळे, रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने, साचलेल्या कचऱ्यावर डासांचे प्रमाण वाढलेले आहे. परिणामी, डेंग्यू आणि मलेरिया या आजारांची लागण होण्याचा धोका जास्त आहे. संतापजनक बाब म्हणजे, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातच महाराष्ट्र शासनाचे “राष्ट्रीय हिवताप प्रतिरोध योजना, ठाणे जिल्हा” यांचे कार्यालय याच ठिकाणी असून, दुर्दैवाने या कार्यालयात कोणीही संबंधित अधिकारी उपस्थित नसल्याची बाब ‘धर्मराज्य पक्षा’च्या निदर्शनास आलेली आहे. पावसाळ्याच्या दिवसांत साथीचे आजार मोठ्याप्रमाणात उद्भवत असतात. त्यातच ठाणे शहर आणि जिल्ह्यात, डेंग्यूचे रुग्ण आढळून आल्याचे वृत्त, प्रसिद्धीमाध्यमांतून प्रकाशित झालेले असताना, या पार्श्वभूमीवर, खुद्द ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातच कचऱ्याचे साम्राज्य निर्माण होणे, हे प्रशासनाला नक्कीच भूषणावह नाही. तरी, याप्रकरणी गांभीर्याने दखल घेत, रोगराईला आमंत्रण देणारे, कचऱ्याचे ढिगारे त्वरित काढून टाकण्यात येऊन, स्वच्छता राखावी आणि नागरिकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, अशी विनंती ‘धर्मराज्य पक्षा’चे सहसचिव नरेंद्र पंडित यांनी, ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्याकडे केली आहे.
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *