तातडीने सुरु करण्याचे नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचे निर्देश

 

 

नवी मुंबई : “मुख्यमंत्री – लाडकी बहीण योजने”ची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने 8 विभाग कार्यालयांप्रमाणेच महानगरपालिका वा शासकीय इमारतींमध्ये सर्व प्रभागांत अर्ज नोंदणी कक्ष तात्काळ सुरु करावेत व त्याची यादी नागरिकांच्या माहितीसाठी सर्व प्रसारमाध्यमांतून व्यापक स्वरुपात प्रसिध्द करावी असे निर्देश देत नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी एकही पात्र महिला लाभ घेण्यापासून वंचित राहू नये याची खबरदारी घ्यावी असे स्पष्ट निर्देश योजनेच्या आढावा बैठकी प्रसंगी दिले.
महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने “मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण” योजना जाहीर करण्यात आली असून 21 ते 65 वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या, निराधार महिला तसेच त्या कुटूंबातील केवळ 1 अविवाहित महिला यांना त्यांच्या आधार लिंक असलेल्या सक्षम बँक खात्यात दरमहा रु. 1500/- इतकी रक्कम डिबीटीव्दारे प्राप्त होणार आहे.
या योजनेचा लाभ घेण्याकरिता पात्र महिला ह्या नारीशक्ती दूत ॲपव्दारे स्वत: ऑनलाईन अर्ज भरु शकतात, तसेच ज्या महिलेला ऑनलाईन अर्ज भरता येत नाही त्या महिलांसाठी अर्ज भरण्याची सुविधा महानगरपालिकेने स्थापित केलेल्या विभाग कार्यालयातील विशेष नोंदणी कक्षामध्ये उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.
या नोंदणी कक्षांची संख्या मोठया प्रमाणात वाढवून प्रत्येक प्रभागात किमान 1 असे 111 नोंदणी कक्ष तात्काळ कार्यान्वित करावेत असे निर्देश आयुक्तांनी या बैठकीत दिले. त्याचप्रमाणे योजनेसाठी पात्र महिलांच्या सुविधेच्या दृष्टीने शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार या कक्षांची वेळ सकाळी 8 ते दुपारी 2 आणि दुपारी 2 ते रात्री 8 अशाप्रकारे 2 सत्रात असावी असेही आयुक्तांमार्फत निर्देशित करण्यात आले.
योजनेकरिता भरण्यात येणारे अर्ज बिनचूक भरावेत व शासन निर्णयात नमूद केलेली पुराव्यांची आवश्यक ती योग्य कागदपत्रे तपासून अपलोड करावीत असेही निर्देश यावेळी देण्यात आले. एकही पात्र लाभार्थी महिला नोंदणी कक्षातून परत जाणार नाही याची दक्षता घ्यावी व अर्ज भरण्याची संपूर्ण कार्यवाही विनामूल्य होईल याची काटेकोर दक्षता घ्यावी असे स्पष्ट निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले.
अर्जात भरली जाणारी माहिती आधारकार्ड पायाभूत मानून त्यानुसार भरावी व अर्ज भरतानाच तो पूर्णपणे योग्य प्रकारे भरला जाईल याची विशेष काळजी घेण्याची आयुक्तांनी नमूद केले. जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत या योजनेची माहिती पोहोचविण्याच्या दृष्टीने फलक लावण्यात यावेत, हस्तपत्रके वितरीत करावीत, सर्व सोशल माध्यमांचा वापर करावा, अर्ज भरणा सुविधा केंद्रांची यादी जास्तीत जास्त माध्यमांतून प्रसिध्द करावी तसेच शाळांमध्येही विद्यार्थ्यांना या योजनेची माहिती देऊन त्यांच्‍यामार्फत त्यांच्‍या घरांपर्यंत योजनेची माहिती पोहचावी यादृष्टीने कार्यवाही करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. बालवाडी शिक्षिका/सेविका, आशा वर्कर तसेच समाजविकास विभागातील समुह संघटक यांच्यामार्फतही त्यांच्या कार्यक्षेत्रातील घराघरात या योजनेची प्रसिध्दी करावी अशा सूचना देण्यात आल्या. विभाग कार्यालयांप्रमाणेच शाळा, रुग्णालये याठिकाणीही होर्डिंग – बॅनर्सव्दारे योजनेची प्रसिध्दी करण्याचे सूचित करण्यात आले.
लाभार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही प्रकारे घ्यावेत व ऑफलाईन घेतलेल्या अर्जांची पोहोच लाभार्थ्यांना द्यावी अशा सूचना देण्यात आल्या. यावेळी अतिरिक्त आयुक्त तथा शहर अभियंता श्री.शिरीष आरदवाड, समाजविकास विभागाचे उपआयुक्त श्री.किसनराव पलांडे, प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री.शरद पवार, शिक्षण विभागाच्या उपआयुक्त श्रीम.संघरत्ना खिल्लारे, वैदयकिय आरोग्य अधिकारी डॉ.प्रशांत जवादे, परिमंडळ 2 चे उपआयुक्त डॉ. कैलास गायकवाड आणि सर्व विभागांचे सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी तसेच शासनाच्या बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीम.ज्योती पाटील आदी अधिकारी उपस्थित होते.
बालविकास विभागाच्या वतीनेही नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 226 अंगणवाड्या सुरु असून त्याठिकाणीही अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी सेविकांमार्फत सुरु आहे. याशिवाय नवी मुंबई महानगरपालिकेची सर्व प्रभागांमध्ये अर्ज भरण्यासाठी नोंदणी कक्ष कार्यान्वित करण्यात येत आहेत. “मुख्यमंत्री – लाडकी बहीण” योजनेची माहिती जास्तीत जास्त प्रसारित करावी व प्रत्येक पात्र लाभार्थ्याला त्याचा लाभ मिळेल अशाप्रकारे कार्यवाही करावी असे स्पष्ट निर्देश नमुंमपा आयुक्त डॉ कैलास शिंदे यांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *