मुंबई –  महाराष्ट्र शासन निर्देशानुसार नवी मुंबई महानगरपालिका स्तरावर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते.
माहे ऑगस्ट 2024 महिन्याचा लोकशाही दिन दि. 05 ऑगस्ट 2024 रोजी होणार असून अर्जदारांनी विहित नमुन्यात आपला अर्ज दोन प्रतींमध्ये दि. 19 जुलै 2024 पर्यंत मा. आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका यांचे नावे ‘लोकशाही दिनाकरीता अर्ज’ असे दर्शनी भागी ठळकपणे नमूद करुन सादर करावयाचा आहे.
सदर अर्जात नमूद तक्रार / निवेदन हे वैयक्तिक स्वरुपाचे असावे. अर्ज एकाच विभागाशी संबंधित एकाच विषयाबाबत असावा. अर्जदाराने संबंधित विषयाबाबत या आधी विभाग कार्यालय, विभागप्रमुख स्तरावर निवेदन सादर केलेले असावे. याशिवाय लोकशाही दिनामध्ये न्यायप्रविष्ट प्रकरणे, राजस्व/ अपिल, सेवाविषयक- आस्थापनाविषयक बाबी याबाबतचे अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची नोंद घेण्यात यावी.
विहित नमुन्यात नसणारे व अर्जासोबत आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. तसेच तक्रार / निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे नसेल तर तसेच यापूर्वीच अंतिम उत्तर दिलेले आहे/ देण्यात येणार आहे अशा प्रकरणी पुन्हा त्याच विषयासंदर्भात केलेले अर्जही स्विकारले जाणार नाहीत याचीही नागरिकांनी नोंद घ्यावी असे सूचित करण्यात येत आहे.
लोकशाही दिनाकरीता करावयाच्या अर्जाचा विहित नमुना नागरिकांसाठी महानगरपालिका नूतन मुख्यालय इमारत, जनसंपर्क विभाग, तिसरा मजला, से. 15 ए, किल्लेगांवठाण जवळ, सी.बी.डी., बेलापूर येथे विनामूल्य उपलब्ध असून नवी मुंबई महानगरपालिकेचे संकेतस्थळ (Website) www.nmmc.gov.in यावरील डाऊनलोड आयकॉनवरून अर्ज नमुना प्रत सहजपणे डाऊनलोड करुन घेता येऊ शकते याची नागरिकांनी नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.
0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *