पुणे : अजित पवारांशी थेट पंगा घेऊन बारामतीत सुनेत्रा पवार यांच्याविरोधात अपक्ष लढण्याची घोषणा करणारे विजय शिवतारे आज शनिवारी दुपारी आपली तलवार म्यान करतील. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत रात्री उशीरापर्यंत चाललेल्या बैठकीनंतर त्यांनी माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. पण तशी अधिकृत घोषणा त्यांनी अद्याप केलेली नाही.
“अपक्ष लढण्याचा निर्णय एकटा घेऊ शकत नाही. पर्वा रात्री जवळ-जवळ अडीच तास चर्चा झाली. रात्री दोन वाजेपर्यंत आम्ही बारिक-सारिक विषयांवर चर्चा केली. माझं लोकांच्या बाबतीत काय म्हणणे आहे, ते मी मांडलं. मतदारसंघातील लोकांच्या भावना मी त्यांच्यासमोर सांगितल्या. परंतू, लोकांमधून मी निर्णय घेतला होता. तसंच उद्या 11 वाजता पुरंदरेश्वरा सासवड येथील निवासस्थानी संपूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्ते यांची बैठक होईल. साधारण 11 ते 1.30 वाजेपर्यंत आम्ही चर्चा करणार आहोत. सर्वांची मतं मी ऐकून घेणार आहे”, त्यानंतर भूमिका जाहीर करणार, असं शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी स्पष्ट केले. ते पुणे येथील पत्रकार परिषदेत बोलत होते.
शेवटी आम्ही स्वत:साठी लढत नसतो
विजय शिवतारे म्हणाले, देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? अजितदादा आणि मुख्यमंत्री शिंदे काय म्हणाले? हे सर्व कार्यकर्त्यांना सांगणार आहे. त्यांना विश्वासात घेऊन नक्की काय करायचे हे तिथे ठरवले जाईल. एक ते दीड दरम्यान उद्या सासवडमध्ये पत्रकार परिषद घेणार आहे. माघार हा शब्द वेगळा आहे. राजकारणामध्ये विचारपूर्वक सर्व कामे करायची असतात. शेवटी आम्ही स्वत:साठी लढत नसतो. जनतेचे प्रश्न घेऊन आम्ही लढतो. त्याबाबत काय चर्चा झाली? ती लोकांना सांगणार आहे. त्यानंतर लोकांचा काय मूड आहे, कार्यकर्त्यांना मूड काय आहे? त्यानंतर निश्चितपणे निर्णय घेईल. निर्णय घेऊनच मी मुंबईला जाणार आहे, असं शिवातारे यांनी सांगितलं.