नाशिक : नाशिक लोकसभा मतदारसंघावरून महायुतीत घमासान लढाई सुरु आहे. शिंदेगटाचे विद्यमान खासदर हेमंत गोडसे यांना तिकीट मिळणार की नाही याबाबत सस्पेंस कायम असतानाच छगन भुजबळ यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असल्याचे वृत्त आहे. परंतु त्यांची उमेदवारी घोषित व्हायच्या आधीच मराठा समाजाने आक्रमक भूमिका घेतली आहे. तशी बॅनरबाजीही नाशिकमध्ये सुरु झाली आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघातील अनेक गावांमध्ये भुजबळ यांच्या विरोधात होर्डिंग्ज देखील लावण्यात आले आहेत. भुजबळांची नाशिक लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच मराठा समाजाचा विरोध वाढला आहे. भुजबळांच्या विरोधात मराठा समाज एकवटल्याचे दिसून येत आहे. आता छगन भुजबळांना नाशिकमधून अधिकृत उमेदवारी मिळणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सोशल मीडियावर छगन भुजबळ यांच्या विरोधात पोस्ट व्हायरल होण्यास सुरुवात झाली आहे. मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या भुजबळ यांना मतदान न करण्याचे आवाहन करण्याऱ्या पोस्ट व्हायरल होत आहेत. भुजबळ यांच्या चेहऱ्यावर काठ मारलेले पोस्टर सोशल मिडियावर टाकण्यात आले आहे.

गुरुवारी नाशिकमध्ये सकल मराठा समाजाची बैठक पार पडली होती. या बैठकीत छगन भुजबळांविरोधात नाराजीचा सूर उमटल्याचे दिसून आले. छगन भुजबळांच्या विरोधात लोकसभेत मराठा उमेदवार द्या, मराठ्यांच्या मुलांचा तोंडचा घास पळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या छगन भुजबळांना गाडण्यासाठी उमेदवार द्यायचा, अशी भूमिका सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *