पुणे : राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) विविध प्रवेश परीक्षांच्या वेळापत्रकात पुन्हा बदल केला आहे. गेल्या काही दिवसांतील हा तिसरा बदल असून, सुधारित वेळापत्रक संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सीईटी सेलने पहिल्यांदा वेळापत्रकात बदल करून सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध केले. त्यानंतर सुधारित वेळापत्रकात एमएचटी-सीईटीतील भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित (पीसीएम) गटातील परीक्षा ५ मे रोजी होणार होती. मात्र त्याच दिवशी वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठीची राष्ट्रीय पात्रता परीक्षा (नीट) होणार असल्याने ते वेळापत्रक बदलून त्या दिवशी परीक्षाच न ठेवण्याचा बदल करावा लागला. त्यानंतर आता तिसऱ्यांदा वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.
नव्या वेळापत्रकानुसार एमएचटी-सीईटीतील भौतिकशास्त्र रसायनशास्त्र जीवशास्त्र (पीसीबी) गटाची परीक्षा २२, २३, २४, २८, २९ आणि ३० एप्रिल रोजी, तर भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र गणित (पीसीएम) गटाची परीक्षा २, ३, ४, ९, १०, ११, १५, १६, १७ मे रोजी होणार आहे. उपयोजित कला अभ्यासक्रम सीईटी १२ मे रोजी, बीए-बीएस्सी बीएड चार वर्षे एकात्मिक अभ्यासक्रम सीईटी १८ मे रोजी, पाच वर्षे विधी अभ्यासक्रमासाठीची सीईटी १८ मे, नर्सिंग सीईटी २४ आणि २५ मे, हॉटेल मॅनेजमेंट पदवी सीईटी २२ मे, बीबीए, बीसीए, बीएमएस, बीबीए सीईटी २७ ते २९ मे रोजी होणार आहे. सविस्तर वेळापत्रक सीईटी सेलच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.