ममता बॅनर्जीचा मातोश्रीवर ठाकरेंना शब्द
मुंबई: उद्धव ठाकरे यांचा पक्ष आणि चिन्ह त्यांच्याकडून हिसकावला तरीही उद्धव ठाकरे वाघासारखे लढले ही गोष्ट मला आवडली. मी आता विधानसभा निवडणुकीत त्यांच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात येईन, असा शब्द तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मातोश्रीवरील भेटीत ठाकरेंना दिला. ममता बॅनर्जी शुक्रवारी मुंबईत आल्या होत्या. यावेळी त्यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
मी नेहमी मुंबईत येते तेव्हा शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना भेटते. आता मुकेश अंबानी यांनी मला निमंत्रित केलेय, म्हणून मी मुंबईत आले आहे, असे ममता बॅनर्जी यांनी सांगितले. केंद्रातील मोदी सरकार स्थिर नाही, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले. मात्र, हे सरकार अस्थिर करण्यासाठी तुम्ही चंद्राबाबू नायडू किंवा नितीश कुमार यांच्या संपर्कात आहात का, असा प्रश्न ममता यांना विचारण्यात आला. त्यावर ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारच्या विरोधात जाऊन मी काहीच करणार नाही, असे सांगितले. मी कोणाच्याही संपर्कात नाही, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले.
यावेळी ममता बॅनर्जी यांना काँग्रेस आणि तुमच्यात सर्वकाही आलबेल नाही का, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर ममता बॅनर्जी यांनी म्हटले की, पूर्वी काँग्रेसचे मुरली देवरा हे माझ्या ओळखीचे होते. मुंबईत आल्यावर मी त्यांना भेटायचे. पण आता मी मुंबईत कोणत्याही काँग्रेस नेत्याला ओळखत नाही. दिल्लीतील काँग्रेस नेत्यांना मी ओळखते. त्यामुळे मुंबईत मी काँग्रेस नेत्यांना भेटत नाही, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले.
