केंद्राचा निर्णय, अधिसूचना जारी!
नवी दिल्ली : आणीबाणीच्या अमानुष वेदना सहन करणाऱ्या सर्वांच्या अतुलनीय योगदानाचे स्मरण करण्यासाठी यापुढे २५ जून हा दिवस ‘संविधान हत्या दिवस’ म्हणून तिसऱ्यांदा सत्तेत आलेल्या भाजप सरकारने घोषित केला आहे. याबाबत केंद्र सरकारकडून अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी सोशल मीडियावर अधिसूचना पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. २५ जून १९७५ रोजी देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती.
गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, २५ जून १९७५ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आपली हुकूमशाही मानसिकता दाखवत देशात आणीबाणी लादत भारतीय लोकशाहीचा गळा घोटला होता. लाखो लोकांना विनाकारण तुरुंगात टाकले आणि माध्यमांचा आवाज दाबला होता. भारत सरकारने दरवर्षी २५ जून हा दिवस ‘संविधान हत्या दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. हा दिवस १९७५ च्या आणीबाणीच्या अमानुष वेदना सहन करणाऱ्या सर्वांच्या अतुलनीय योगदानाचे स्मरण करेल.
